बॉक्सर मोहम्मद अलीला ओळखत नसतील असे लोकं अगदी मोजकेच असतील. आपल्या कारकिर्दीत केवळ बोटावर मोजता येईल इतके कमी सामने हरलेला अली अनेक बॉक्सर युवकांचे प्रेरणास्थान आहे. तर गोष्ट आहे 1954 सालची एक बारा वर्षांचा मुलगा. सायकल चोरीला गेली म्हणून तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशनला जातो. पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर ड्युटीवर असलेल्या पोलीस ऑफीसर जॉय मार्टिन यांच्याशी त्याची भेट होते आणि खऱ्या अर्थाने एका महान बॉक्सरच्या करिअरला सुरुवात होते. पोलीस स्टेशनमध्ये गेलेल्या त्या मुलाला भेटलेले पोलीस ऑफिसर जॉय मार्टिन त्याच्याकडे पहात म्हणतात, पोलीस स्टेशनच्या चकरा मारण्यापेक्षा स्वतःच चोर शोधायचास ना? दिसतोस तर हट्टा कट्टा. तू तर बॉक्सर व्हायला हवंस. तुझी जर इच्छा असेल तर मी तुला बॉक्सिंगचे ट्रेनिंग देऊ शकतो. हे बोलणारे पोलीस ऑफिसर मार्टिन स्वतः एक बॉक्सिंग कोच होते.
तुम्हाला प्रश्न पडला असेल जॉय मार्टिन यांना पोलीस स्टेशन मध्ये भेटलेला तो बारा वर्षांचा मुलगा नक्की कोण? तर हो मी त्याच्या बद्दलच तुम्हाला सांगणार आहे. 1964 साली 22 वर्षांच्या वयात सोनी लिस्टनला पराभूत करून वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियन बनलेल्या कॅसियस मार्कलस क्ले च्या बॉक्सिंग मधल्या प्रवासाची ही गोष्ट आहे. सोनी लिस्टनचा पराभव ही खूप मोठी घटना होती आणि त्यावेळी त्याने डायलॉग मारला ‘फ्लोट लाइक अ बटरफ्लाई, स्टिंग लाइक अ बी’. जिंकल्यानंतर तो म्हणाला – मी महान आहे. यानंतर थोड्या वेळाने वॉलेस डी फ्रेड डेट्रॉईटमध्ये मुहम्मदकडे गेले. ‘नेशन ऑफ इस्लाम’ मध्ये सामील होऊन त्याने आपले नाव बदलले. तेव्हापासून कॅसियस मार्कलस क्ले मोहम्मद अली झाला आहे. होय, तोच मुहम्मद अली, ज्याला आपण ओळखता.
मुख्याध्यापकांचा अलीवर होता विश्वास
जेव्हा त्याने मार्टिनकडून बॉक्सिंग शिकण्यास सुरवात केली तेव्हा लवकरच अली इतर बॉक्सरपेक्षा पुढे गेला. यामुळे त्याच्या शालेय अभ्यासामध्ये अडचणी निर्माण झाल्या. नुकतीच सरावाला सुरुवात झाली होती आणि त्याने ‘केंटकी गोल्ड ग्लोव्हज’ मध्ये सहा सुवर्ण पदके जिंकली. खेळातील त्यांची आवड आणि पदकांचे महत्व लक्षात घेऊन शाळेत कमी गुण मिळूनही पदवीपर्यंत त्याला प्रवेश मिळाला. हा मुलगा एक दिवस शाळेचे नाव रोशन करेल असा विश्वास त्याच्या मुख्याध्यापकांना होता.
अमेरिकन लष्करात भरती व्हायला दिला नकार
अमेरिका आणि व्हिएतनाम यांच्यात युद्ध सुरू होते. सैन्याला तरुणांची गरज होती. 1967 मध्ये त्याला अमेरिकेच्या सैन्यदलात भरती होण्याची ऑफर मिळाली. अलीने भरती होण्यास नकार दिला. यामध्ये त्याचे काही धार्मिक मुद्दे होते. सैन्याला नकार सहन झाला नाही.यामुळे अलीला अटक करण्यात आली. त्याचे हेवीवेट शीर्षकही काढून घेण्यात आले. कायदेशीर अडचणींमुळे अली पुढील चार वर्षे खेळू शकला नाही.
4 वर्षे रिंग बाहेर राहूनही तो जिंकला
वर्ष 1971 जेव्हा उजाडले तोपर्यंत युद्ध संपुष्टात आले होते. त्यामुळे अलीवरची बंदीही उठविण्यात आली. कोर्टानेही त्यांच्या बाजूने निकाल दिला. युद्धाला नकार देणाऱ्या नागरिकांसाठी अली हिरो बनला होता. अली बॉक्सिंग रिंगमध्ये परतला. जेव्हा तो परत आला तेव्हा लोकांमध्ये विक्रमी उत्साह होता. कारण बॉक्सिंग मधला वाघ परतला होता. अली कुणी ऐरागैरा नव्हता. इतक्या दिवसांनी परतला तरी त्याची दहशत कायम होती. रिंगमध्ये सर्वांत देखणा आणि ठसठशीत तो दिसत होता. साठच्या दशकातला मोहम्मद अली सत्तरच्या दशकातही चॅम्पियन बनला.
फ्रेझरने अलीला पराभूत केले
8 मार्च 1971. हे ठिकाण होते मॅडिसन स्क्वेअर गार्डन, न्यूयॉर्क शहरातले. ‘द रिंग वर्ल्ड हेवीवेट टायटल’ ची लढत सुरू झाली. पहिली फेरी, दुसरी फेरी. अलीच्या समोर फ्रेझर होता. परंतु फ्रेझर दोन फेऱ्यांपर्यंत टिकू शकला नाही. पण पुढच्या फेऱ्यांमध्ये त्याने अलीवर वर्चस्व मिळवले. तिसरा, चौथा राउंड आणि गेम पालटला. तिथे 14 फेऱ्या झाल्या. कोणताही बॉक्सर हार मानण्यास तयार नव्हता.
पण, 15 व्या फेरीने संपूर्ण जगाला धक्का दिला. एकापाठोपाठ 31 लढती जिंकणारा मोहम्मद अली पहिल्यांदाच रिंगमध्ये हरला. फ्रेझरचा हा विजय होता. अलीचा पराभव होईल असे कुणालाही वाटले नव्हते. अली हरला होता. 32 व्या लढ्यात प्रथमच. हा शतकातील महान खेळाडूचा पराभव होता की हा देवाचा संकेत होता ? देवाने हे निश्चित करण्याचा प्रयत्न केला की त्याने एका व्यक्तीला जमिनीवर पाठवले आहे. ज्याला लागू शकते, वेदना होऊ शकतात आणि तो पराभूत देखील होऊ शकतो. अखेर फ्रेझरने अलीला पराभूत केले.
शतकातला हा सर्वोत्कृष्ट लढा होता. यानंतर दोन्ही बॉक्सरला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, या पराभवाचा मोहम्मद अलीनेही सूड घेतला होता. तीन वर्षांनंतर 28 जानेवारी 1974 रोजी 12 फेऱ्यांपर्यंत चाललेल्या लढतीत अलीने फ्रेझरला पराभूत केले.
प्रेमाने वाचवले प्राण
19 जानेवारी 1981 रोजी लॉस एंजेलिसमधील इमारतीच्या नवव्या मजल्यावरून एक व्यक्ती उडी मारुन मरणार होता. त्याची मानसिक स्थिती पूर्णपणे ढासळून गेली होती. त्यावेळी त्याला वाचवणारे कोणी नव्हते. पोलीसही घटनास्थळी पोहचले नव्हते. अशा परिस्थितीत मोहम्मद अलीने त्याला भाऊ मानून त्यांच्याशी संवाद साधला. त्याची समजूत काढली. अलीचे प्रेम पाहून त्याने आत्महत्या करायचा निर्णय मनातून काढून टाकला आणि या घटनेमुळे त्याचा जीव वाचला.
संपूर्ण कारकिर्दीत केवळ 5 फाईट्स हरला
6 फूट 3 इंच उंच असलेल्या अलीने 61 फाईट्स पैकी 56 फाईट्स जिंकल्या. यापैकी 37 मध्ये नॉकआउट फेरीत समोरच्याचा पराभव केला. संपूर्ण आयुष्यात फक्त पाच वेळा तो हरला. त्याचा 61 वा सामना ट्रेव्हर बार्बिकशी होता तो खेळल्यानंतर त्यामध्ये त्याला हार मानवी लागली आणि 1981 सालचा तो सामना त्याचा शेवटचा सामना ठरला. त्यानंतर अलीने सेवानिवृत्ती घेतली. रिंगमध्ये झालेल्या जखमांचा त्याच्या शरीरावर परिणाम झाला. त्या जखमांमुळे अली पार्किन्सन आजाराला बळी पडला. उपचारादरम्यान, 3 जून 2016 रोजी अमेरिकेतल्या एका रूग्णालयात त्यांचे निधन झाले.