महाराष्ट्राच्या राजकाराणाला कलाटणी देणारे तसेच राजकारणातले चाणक्य म्हणून ज्यांची महाराष्ट्रासह देशभरात ओळख आहे, अशा शरद पवारांनी कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावर कशी मात केली हे आपण जाणून घेणार आहोत. 2004 सालची ही गोष्ट आहे जेव्हा शरद पवार यांना मुखाचा कर्करोग झाला होता आणि डॉक्टरांनी केवळ 6 महिन्यांचा अवधी त्यांना दिला होता.
अलीकडच्या काळात अगदी महिन्याभरापूर्वी शरद पवारांना पित्ताशयाचा त्रास जाणवू लागल्यामुळे एक छोटी शस्त्रक्रीया करण्यात आली होती. परंतु, शरद पवारांवर झालेली ही पहिली शस्त्रक्रिया नाही. यापूर्वी पवारांनी कॅन्सर सारख्या एका दुर्धर आजावार मात केली आहे.
शरद पवारांना इतक्या दुर्धर आजारावर मात करण्याची प्रेरणा कुठून मिळाली. खरे तर तुमच्याकडे अगदी सहा महिन्या इतका कमी वेळ आहे असे डॉक्टरांनी सांगितले होते. तो काळ होता 2004 च्या निवडणुकांच्या वेळेचा. निवडणुका नुकत्याच घोषीत झाल्या होत्या आणि शरद पवार नेहमीप्रमाणे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन प्रचार करत होते. या प्रचारा दरम्यान नेहमीच त्यांच्या सोबत त्यांचे मित्र डॉक्टर रवी बापट असायचे अशाच प्रचाराला जात असताना एक दिवस पवारांना आपल्या गालाच्या आतल्या बाजुला कसली तरी गाठ असल्याचे जाणवले. त्यांनी ही बाब तात्काळ डॉक्टर बापट यांच्या कानावर घातली. यावर बापटांनी या गाठीचे निदान करणे आवश्यक असल्याचे पवारांना सांगितले. त्यानंतर ते तातडीने मुंबईला आले त्यांनी मुंबईत ब्रीच कँडी रुग्णालयात सर्व तपासण्या केल्या आणि तेव्हा आलेल्या रिपोर्ट मध्ये पवारांना मुखाचा कर्करोग असल्याचे समोर आले. पवारांनी आपल्या परिवारातील काही लोकांसह पक्षातल्या जवळच्या मुख्य लोकांशी याबाबत संवाद साधला. त्यासाठी त्यांनी सर्वांना पुण्याला बोलावून घेतले आणि ही बाब कानावर घातली. काही डॉक्टरांनी पवारांकडे केवळ सहा महिने असल्याचे सांगितले हा सर्व प्रकार शरद पवारांच्या कुटुंब, मित्र आणि कार्यकर्त्यांसाठी मोठा आघात होता. पण सर्व गोष्टी पुर्ववत चालू ठेवाव्यात अशा सुचना पवारांनी सर्वांना दिल्या. त्यानंतर त्यांनी कॅन्सरच्या इलाजासाठी वेग वाढवला कारण अशा आजारांमध्ये उशीर करुन उपयोग नसतो. पवारांचे ऑपरेशन करण्यात आले हे ऑपरेशन वाटते तितके सोप्पे नव्हते. कारण, या ऑपरेशन नंतर अनेकदा भाषण करताना त्यांच्या मुखातून रक्तश्राव होत असे. इतकेच नव्हे पाणी पिण्याआधी भुलीचे इंजेक्शन करावे लागत असे. या शस्त्रक्रियेसाठी मुखाचा काही भाग कापून मांडीचा काही भाग तेथे लावण्यात आला होता. काही दात काढण्यात आले होते त्यामुळे ही शस्त्रक्रिया प्रचंड वेदना देणारी होती. हा प्रसंग 2004 चा आहे आणि आजही 2021 पर्यंत बघत आहोत शरद पवार कशा प्रकारे धीरोदत्तपणे उभे आहेत. त्यांचा उत्साह आजच्या तरुण पिढीला लाजवेल असा आहे. पुन्हा एकदा त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तेचा नवीन प्रयोग करुन सर्वांचे लक्ष वेधले.
अशा परिस्थितीत इतक्या मोठ्या आजारातून सावरण्याची प्रेरणा पवारांना कुठून मिळाली या मागे एक प्रसंग आहे. हा प्रसंग आहे त्यांच्या लहानपणीचा. पवार लहान असताना त्यांच्या मूळ गावी म्हणजे काटेवाडीला गावात एक वळू देवाला सोडलेला होता. हा वळू कोणत्या तरी देवासाठी सोडण्याची प्रथा आहे. त्यामुळे धार्मिक भावना दुखावू नयेत म्हणून लोक अशा प्राण्यांना मारत किंवा हकलत नाही. अनेकदा या वळूचा लोकांना त्रास होत असे मात्र लोक शांत राहत असतं. अशातच एक दिवस रात्री गावतल्या कोणत्या तरी एका माणसाने या वळूला पायात गोळी मारली. त्यामुळे जखमी असलेला हा वळू गावतल्या एका शेताच्या कोपऱ्यात जाऊन पडला होता. दुसऱ्या दिवशी शरद पवारांच्या आई शारदाबाई तिथून निघाल्या होत्या. त्यावेळी त्यांना जखमी अवस्थेत असलेला हा वळू दिसला. प्राणी वेदनेने कळवत आहे हे पाहून त्या तिथे गेल्या आणि त्याच्या अंगावर मायेने हात फिरवू लागल्या. मात्र, प्राण्यांना दुखापत झाल्यानंतर ते अधिकच आक्रमक होत असतात. त्याच प्रमाणे या वळूने शारदाबाईंवर हल्ला केला आणि या हल्ल्यात जखमी झालेल्या शारदा बाईंच्या पायाच्या एका मांडीचा पूर्णपणे चुरा झाला. पुढे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेचा परिणाम म्हणून त्यांचा तो पाय 6 इंचाने लहान झाला. त्यामुळे त्या पुढे कधीही दोन्ही पायांवर नीट चालू शकल्या नाहीत. त्यांना नेहमीच काठी किंवा कुबड्यांचा आधार घ्यावा लागला.
इतक होऊनही त्या कधीच खचल्या नाहीत…
सदर अपघातानंतरही शारदाबाई कधीही खचल्या नाहीत. त्यानंतरही त्यांनी त्यांचे आयुष्य पूर्वी प्रमाणे सुरु ठेवले. त्या पूर्वीपासूनच सामाजिक कार्यात अग्रेसर होत्या. आधीपासूनच समाजकार्य करत असल्यामुळे अपघातानंतरही त्यांनी सुरूच ठेवले. शरद पवार सांगतात त्यांची अपघातानंतरही जगण्याची उर्मी कायम होती. शरद पवारांचे बंधू सुर्यकांत यांच्या पत्नी ब्रिटीश आहेत. आपली एक सून इंग्रजी बोलत असल्यामुळे तिच्याशी संवाद सुलभ व्हावा या करिता त्या इंग्रजी शिकल्या होत्या. इतकेच नव्हे तर पवारांच्या घरी जेव्हा पहिली मोटार आली तेव्हाही त्यांनी ती चालवता यावा यासाठी ड्रायव्हिंग शिकून घेतली. असा त्यांच्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन होता. पवारांच्या आईचा हा पॉजिटीव्ह अप्रोच त्यांच्या जीवनावर परिणाम करुन गेला.