प्रशांत किशोर आहेत का राजकारणातील खरे चाणक्य..?

हल्लीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची भेट झाल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे . कोण आहेत प्रशांत किशोर याविषयी अनेकांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे. तर प्रशांत किशोर हे असे व्यक्तिमत्व आहे जे इतरांचे व्यक्तिमत्व लोकांसमोर आणण्यासाठी प्रसिद्ध आहेत. परंतु, स्वतः प्रसिद्धीपासून देखील ते दूर राहिले नाहीत. त्याचे मुख्य कारण म्हणजे ते ज्या व्यक्तीसाठी काम करतात त्या व्यक्तीबरोबर स्वतः देखील मीडिया आणि सोशल मीडियावर मोठ्या चतुराईने स्वतःला प्रसिद्ध करत असतात. ज्या दिवशी निवडणुकीचा निकाल जाहीर होतो, त्यादिवशी प्रचार करत असलेल्या आणि निवडून आलेल्या त्या महत्वाच्या नेत्या बरोबर ते स्वतःचा फोटो प्रसिद्ध करतात. तसेच आपल्या टीमला शुभेच्छा देत, केलेल्या कामाचे श्रेय देखील घेतात.

प्रशांत किशोर यांच्याविषयी असे म्हटले जाते की प्रसारमाध्यमांमध्ये असलेले त्यांचे चांगले संबंध ते प्रचारासाठी देखील वापरतात. ‘अब की बार मोदी सरकार’, ‘बिहार में बहार है तो, ओ नितीश कुमार है’ यांसारख्या घोषणांनी राजकीय नेत्यांचे वजन वाढवण्यात गेल्या सहा वर्षांपासून सक्रिय असलेल्या प्रशांत किशोर यांनी राजकीय वर्तुळात आपले एक महत्त्वपूर्ण स्थान प्रस्थापित केले आहे. 

प्रशांत किशोर आहे PK नावाने प्रसिद्ध

राजकीय वर्तुळात PK नावाने प्रसिद्ध असलेल्या प्रशांत किशोर यांनी त्यांच्या प्रचाराच्या जोरावर अनेक राजकिय नेत्यांना निवडणुकीत यश मिळवून दिले आहे. यापूर्वी प्रशांत किशोर यांना जनता दल युनायटेड मधून काढून टाकण्यात आलेली आहे. जेडीयू अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री असलेल्या नितेश कुमार यांनी 2018 मध्ये प्रशांत किशोर यांना पक्षाचे उपाध्यक्ष बनवले होते. यापूर्वी प्रशांत किशोर यांची ओळख राजकीय रणनितीकार अशी होती. जेडीयू उपाध्यक्ष केल्यानंतर ते औपचारिकरित्या राजकारणात आले होते. 

आधी रणनीती आणि नंतर राजनीती या दोन शब्दांमध्ये प्रशांत किशोर यांच्याबद्दल बरेच काही बोलले जाते. बिहार मध्ये जन्मलेल्या, वाढलेल्या, शिक्षण घेतलेल्या अनेक देशांमध्ये राहिलेल्या प्रशांत किशोर यांना कोण नाही ओळखत? प्रशांत किशोर यांचे वडील बिहारमध्ये एक सरकारी डॉक्टर आहेत. प्रशांत यांचे सुरुवातीचे शिक्षण बिहारमध्ये झाले आणि त्यानंतर इंजिनीअरिंगचे शिक्षण घेण्यासाठी ते हैद्राबादला गेले. त्यानंतर त्यांना संधी मिळाली ती आफ्रिकेला जाऊन युनिसेफ सोबत काम करायची. परंतु त्यांनाही नोकरी आवडली नाही म्हणून ते पुन्हा आपल्या मायदेशी परतले.

राजकारणाशी आला संबंध

आफ्रिकेतून परत आल्यानंतर गुजरातमधील एका अभियानादरम्यान त्यांची ओळख गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी झाली. आफ्रिकेतून भारतात परतलेले प्रशांत किशोर 2012 च्या विधानसभा निवडणुकीत गुजरात मध्ये नरेंद्र मोदींचा प्रचार सुरू केल्यानंतर राजकीय रणनितीकार म्हणून सर्वांसमोर आले.

त्यावेळी सर्वात पहिल्यांदाच राजकीय प्रचारासाठी अत्याधुनिक टेक्नॉलॉजी आणि सोशल मीडियाचा वापर करण्यात आला होता. 2013 साल की जेव्हा भाजपाने नरेंद्र मोदींना आपला पंतप्रधानपदाचा दावेदार घोषित केले तेव्हा त्यांच्या प्रचार मोहिमेचे नेतृत्व प्रशांत किशोर यांनी केले. त्यानंतर 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्याप्रकारे सोशल मीडिया आणि टेक्नॉलॉजीचा प्रचारासाठी वापर करण्यात आला तो प्रयोग सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देणारा होता. 

भाजपाशी फारकाळ जमले नाही

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर काही दिवसातच प्रशांत किशोर यांना भाजपातून काढून टाकण्यात आले. असे म्हटले जाते की नरेंद्र मोदींचे विश्वासू असलेल्या अमित शहा आणि प्रशांत किशोर यांच्यात मतभेद होते. भाजपातल्या काही नेत्यांच्या मते प्रशांत किशोर आणि अमित शहा यांचे 2012 साली पहिल्यांदा प्रशांत किशोर नरेंद्र मोदींना भेटले तेव्हापासूनच मतभेद होते. कारण दोघेही नरेंद्र मोदींच्या गुड बुक मध्ये राहण्यासाठी प्रयत्न करत होते.

तोपर्यंत अनेक वर्ष भाजपासोबत राहिलेले नितीश कुमार नरेंद्र मोदींचे नाव पुढे करत भाजपापासून विभक्त झाले होते. विरोधक असलेल्या लालूप्रसाद यादव यांच्या पक्षाशी त्यांची जवळीक वाढली होती. नितीश कुमार हे काँग्रेसचे देखील कट्टर विरोधक होते. परंतु राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी काँग्रेसशी जवळीक साधली होती.

त्यानंतर नितीश कुमार यांची जवळीक बिहार मधूनच असलेल्या प्रशांत किशोर यांच्याशी वाढली. तेव्हा नितीश कुमार 2015 साली होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीची तयारी करत होते. भाजपा पासून विभक्त होऊन 2014 ची लोकसभा निवडणूक लढवणारा नितीश कुमार यांचा पक्ष बिहारमध्ये केवळ 2 जागांवर विजय मिळवू शकला होता. त्याच वेळी त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.  त्यानंतर त्यांनी जितन राम मांजी यांना बिहारचे मुख्यमंत्री बनवले होते. त्यांचा हा निर्णय त्यांना वारंवार त्रासदायक ठरत होता.

त्याचवेळी नितीश कुमार 2015 च्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले होते. परंतु, पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांना अशक्य वाटत असलेली आघाडी तयार करणे अतिशय गरजेचे होते. या आघाडीमध्ये जेडीयु शिवाय काँग्रेस आणि आरजेडी ने एकत्र येणे गरजेचे होते. त्यावेळी प्रशांत किशोर यांनी या तीन पक्षांना एकत्र आणण्यात मोलाची भूमिका बजावली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. विषेश म्हणजे त्यांच्या या प्रयत्नाला यश आले आणि बिहार विधानसभा निवडणुकीत जबरदस्त यश नितीश कुमार यांच्या पदरात पडले. 

नितीश कुमार यांच्या मोहिमेतील ‘हर घर दस्तक’,’ बिहार मे बहार है, ओ नितीश कुमार है’ यांसारख्या प्रसिद्ध घोषणांमागे देखील प्रशांत किशोर यांचाच हात होता. 

या राजकिय यशानंतर नितीश कुमार यांची प्रशांत किशोर यांच्या मोठ्या प्रमाणात जवळीक वाढली. या घटनेनंतर नितीशकुमार यांना नरेंद्र मोदींचा राष्ट्रीय पातळीवर असलेला कट्टर विरोधक म्हणून ही पाहिले जात होते. हेच कारण होते ज्यावेळी 2015 ला नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत होते तेव्हा पक्षात सर्व ज्येष्ठ नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. मात्र, अवघ्या काही दिवसात नितीश कुमार भाजपासोबत आले आणि प्रशांत किशोर यांना जेडीयु चे उपाध्यक्ष बनविले गेले. मात्र तेव्हाही ते भाजपच्या विरोधी पक्षांसोबत काम करत होते

त्यानंतर ते जगन मोहन रेड्डी यांच्या YSR काँग्रेससोबत जोडले गेले. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्यासोबत काम करू लागले. हल्लीच ते दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी सोबत देखील काम करत होते. 

याबद्दल अनेकदा असे म्हटले गेले की प्रशांत किशोर यांचा पक्ष भाजपसोबत आहे. परंतु, ते भाजपा विरोधी पक्षासोबत काम करतात. अनेकदा नितीश कुमार यांनाही यावरून प्रश्न विचारले गेले. अर्थात नितीश कुमार यांच्यासाठी हा एक राजकिय पेच होता. नंतर प्रशांत किशोर त्यांची मते वेगवेगळ्या प्रकारे मांडू लागल्यामुळे प्रशांत यांना जेडीयु मधून काढून टाकण्यात आले.  

इतरही काही कारणांनी प्रशांत किशोर झाले प्रसिद्ध

2014 मध्ये त्यांनी CAG ची स्थापना केली होती. जी पहिली भारतीय राजकिय कारवाई समिती आहे. ही अशी एक अशी NGO आहे ज्यामध्ये IIT मध्ये शिकणारे विद्यार्थी देखील सहभागी होते. मोदींच्या अनेक मोहिमांचे श्रेय प्रशांत किशोर यांना दिले जाते. 

प्रशांत किशोर यांच्याविषयी ठळक मुद्दे थोडक्यात

  1. राजकीय रणनीतीकार म्हणून त्यांची ओळख आहे.
  2. आगळ्यावेगळ्या आणि परिणामकारक प्रचार मोहिमांसाठी ते प्रसिद्ध आहेत.
  3. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींसाठी त्यांनी रणनीती आखली होती.
  4. ‘चाय पे चर्चा’, ‘अब की बार’ या घोषणा त्यांच्या रणनीतीचा एक भाग होत्या.
  5. बिहार निवडणुकीत नितीश कुमारांना सुद्धा त्यांनी साथ दिली होती.
  6. नितीशकुमार आणि लालू प्रसाद एकत्र येण्यात प्रशांत किशोर यांचा मोलाचा वाटा असल्याचे मानले जाते.
  7. पंजाब आणि उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत त्यांनी राहुल गांधींसोबत देखील काम केले आहे.