मनोहर पर्रीकरांच्या जीवन प्रवासातील काही रंजक गोष्टी..

माणूस राजकारणात आला तर समाजकारण बघायचं सोडून पहिला आपल्या भातावर डाळा ओढायचा प्रयत्न करतो. थोडक्यात काय तर स्व हीत साधण्याचा प्रयत्न करतो. आता तुम्ही म्हणाल, सर्व लोकं काही सारखे नसतात. अगदी खरंय… राजकारणातही येऊनही केवळ समाजाच हीत आणि सर्वांगीण विकास करण्यासाठी राजकीय वर्तुळात सक्रीय असलेले काही नेते, या देशाने पाहिलेत हे ही तितकेच खरे आहे. अशाच काही निवडक लोकांपैकी एक म्हणजे गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते दिवंगत मनोहर पर्रीकर होय. तर तब्बल 6 वेळा गोव्याचे मुख्यमंत्री पद भुषवलेल्या या साध्या सरळ माणसाच्या आयुष्यातल्या काही रंजक गोष्टींवर आज आपण प्रकाश टाकणार आहोत….

गोव्यामध्ये 13 डिसेंबर 1955 रोजी जन्माला आलेले गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे माजी संरक्षण मंत्री पर्रीकर यांचे दीर्घकाळ आजाराला झुंज दिल्यानंतर 17 मार्च 2019 रात्री प्राण ज्योत मालवली. पर्रीकरांना जाऊन आज जवळपास 2वर्षे पूर्ण झाली असली तरी भारतीय राजकारणात साधी राहणी असलेला नेता म्हणून त्यांची ओळख जनतेच्या मनात कायम आहे. 

26 व्या वयात आरएसएस मध्ये एंट्री-

उच्च विद्या विभूषित राजकारणी असलेले मनोहर पर्रीकर यांनी आयआयटी मुंबई येथून मेकॅनिकल इंजीनियरिंगचा अभ्यास केला होता. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अवघ्या काही वर्षात म्हणजेच वयाच्या 26 व्या वर्षी त्यांनी आरएसएसमध्ये प्रवेश केला. पर्रीकर आयुष्यभर हाफ शर्ट आणि साध्या पँटमध्ये दिसत होते. मुख्यमंत्री असूनही पर्रीकर कधीही सुट-बुट मध्ये फारसे दिसले नाहीत. पर्रीकरांच्या साधेपणाचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे त्यांनी आपल्या मुलाच्या लग्नातही हाफ शर्ट, पँट आणि सँडल घातले होते. मुख्यमंत्री असतानाही ते विधानसभेत सरकारी गाडी वापरण्याऐवजी स्कूटरचा वापर करत. गोव्याचे मुख्यमंत्री असतानाही अनेक वर्ष त्यांनी मुख्यमंत्री हाऊसचा वापर केला नाही.

स्वः खर्चातून करत असतं विमान प्रवास- 

आजकाल नेतेमंडळी मोबाईल फोनचे बिल, प्रवास भत्ता यांसह अनेक प्रकारे सरकार कडून पैसे लुटत असतात. मात्र, स्वः खर्चाने प्रवास करणारा नेता म्हणजे मनोहर पर्रीकर. ते अनेकदा सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करत असत. याशिवाय ते फ्लाईटमध्ये इकॉनॉमी क्लास मध्ये प्रवास करत. याशिवाय मोबाईलचे बिल ते आपल्या पर्सनल खर्चातून भरत असत. एक मंत्री तथा मुख्यमंत्री असताना कितीतरी वेळा विमान प्रवास करायला लागणे म्हणजे नवल नाही. परंतु या प्रत्येक वेळी जनसामान्यांसोबत स्वः खर्चातून इकॉनॉमी क्लासने प्रवास करणे हे मात्र नवल करण्यासारखे आहे. 

सर्जिकल स्ट्राईक दरम्यान पूर्ण रात्र होते जागे- 

पर्रीकर दररोज 16 ते 18 तास रोज काम करत असत. टेलिकॉम मिनिस्टर रवी शंकर प्रसाद यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीमध्ये सांगितले, सर्जिकल स्ट्राईक दरम्यान पर्रिकर पूर्ण रात्रभर जागे होते. त्यांनी या मोहिमेची संपूर्ण रात्र जागे राहून माहिती घेतली होती. 2014 ते 2017 या कार्यकाळात ते देशाचे संरक्षणमंत्री असताना भारत आणि फ्रान्स यांच्यात लढाऊ विमान राफेल बाबत करार संपन्न झाला होता. ही त्यांच्या संरक्षणमंत्री असतानाची सर्वात महत्त्वपूर्ण बाब मानली जाते. 

लाल दिव्याच्या गाडीची त्यांना लालसा नव्हती-

आपल्या स्वतःच्या कामासाठी जाताना ते अनेकदा आपल्या स्कुटरवरुन प्रवास करत असतं. सरकारी वाहनाचा त्यांनी कधीच दूर उपयोग केला नाही. स्वतःची गाडीही अनेकदा ते स्वतःच चालवत. सर्वसामान्य लोकांच्या मनात स्कुटरवाला मुख्यमंत्री म्हणून त्यांनी घर केले. त्यांनी कधीही शासकीय निवासस्थानाचा वापर केला नाही. त्यांनी मुख्यमंत्री असताना केवळ कार्यालयीन कामासाठी मुख्यमंत्री निवासस्थानाचा वापर केला. 

सोबत आणलेले एक जोडी कपडेही हरवतात- 

ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या निधनानंतर ते अंतिम दर्शनासाठी दिल्लीला रवाना झाले होते. त्यावेळी सोबत घेवून गेलेले 2 जोडी कपडेही त्या गोंधळात कुठेतरी हरवले. त्यांच्या एका सहकार्याने त्यांना विचारले की तुमचे कपडे कुठे आहेत. त्यावर ते नम्रपणे म्हणाले की मी 2 जोडी कपडे सोबत आणले होते ते या गोंधळात कुठेतरी हरवले आहेत. त्यानंतर कशीतरी व्यवस्था करुन त्यांना दुसऱ्या दिवशी वापरण्या योग्य कपडे मिळाले. मुख्यमंत्री राहीलेले देशाचे रक्षा मंत्री कसलीही बॅग नाही गाजावाजा नाही इतक्या शांतपणे कसे करु शकतात हे पाहूण अनेकजण आश्चर्यचकीत झाले. 

सुरक्षा रक्षकांचा फौजफाटा कधीच बाळगत नव्हते-

एखादा व्यक्ती साधा नगरसेवक झाला आणि प्रसिद्धीच्या झोतात आला तर सुरक्षा रक्षकांचा फौजफाटा बाळगून असतो. मात्र, राज्याचा मुख्यमंत्री असून 1 सुरक्षा रक्षकाला सोबत घेऊन समाजात सहज वावरणारे व्यक्तीमत्व म्हणजे पर्रीकर होय. कधी कधी पायी पायी ते खरेदीला जात असत. अनेकदा बाजारात आणि कार्यालयातही केवळ आपल्या एका सुरक्षा रक्षकासोबत ते जाताना अनेकांना आश्चर्याचा धक्का बसत असे. 

कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराने ग्रस्त असूनही त्यांनी कधीच सुट्टी घेतली नव्हती- 

कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराने ग्रस्त असूनही त्यांनी कधीच सुट्टी घेतली नाही. नाकात पाईप असूनही ते काम करत राहीली. कधीही आत्मविश्वास ढळू दिला नाही. ते कधीही शेवटपर्यंत खचले नाहीत. गोव्याचे नागरीक आणि आपल्यात त्यांनी कधीही सत्ता अन राजकारण येवू दिले नाही. केवळ याच कारणामुळे ते 6 वेळा गोवा विधानसभा निवडणुकीत सहज निवडून आले. पर्रीकरांच्या कारकीर्दीतले हे काही किस्से पाहिले की सहज वाटत यांनाच म्हणायचं का? जनसामान्यांचा नेता.