कोरोनाकाळात महाराष्ट्राला ऑक्सिजन पुरवठा करणारे आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी तसे सर्वांना सुपरिचित असे व्यक्तीमत्व आहे. दोन वर्षांपूर्वी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेल्या जगन मोहन रेड्डींना एक राजकीय वारसा आहे. परंतु, राजकारणात त्यांनी त्यांच्या हिंम्मतीवर छाप उमटवली आहे. एका योद्धासारखा भारतातल्या राजकीय वर्तुळात जगन मोहन रेड्डींचा प्रवास राहिला आहे. त्यांचा राजकीय प्रवास हा एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही. ते आपल्या प्रचंड इच्छा शक्तीच्या बळावर आपल्या ध्येयाकडे वाटचाल करत राहीले आणि आता त्यांचे ध्येय त्यांच्या हातात आहे. मोठ्या संघर्षातनंतर 46 वर्षीय जगन मोहन रेड्डी यांनी आंध्रप्रदेशमधून चंद्राबाबू नायडू यांचे सरकार हलवले आहे.
जगन मोहन रेड्डी यांचा पक्ष YSR काँग्रेस ने आंध्रप्रदेशच्या विधानसभा निवडणुकीमध्ये 175 पैकी 151 जागा जिंकल्या. लोकसभेच्या 25 जागांपैकी 22 जागा जिंकल्या. विधानसभा निवडणुकीनंतर लोकसभेलाही जगन मोहन रेड्डींवर जनतेने विश्वास दाखवला. त्यामुळे 25 पैकी 22 जागांवर त्यांनी विजय पताका फडकवली. तसे तर जगन मोहन रेड्डींना राजकीय वारसा लाभला परंतु यशा पर्यंत त्यांना त्यांच्या प्रचंड इच्छाशक्ती आणि मेहनतीने पोहचवले. जगन मोहन रेड्डींचे वडील वाय.एस.आर रेड्डी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री होते. 2009 साली जगन मोहन रेड्डींच्या वडिलांचा एका हेलिकॉप्टर दुर्घटनेत मत्यू झाला आणि त्यानंतर जगन मोहन रेड्डींच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली.
वडिलांच्या निधनामुळे राजकारणात प्रवेश-
राजकारणात पाऊल ठेवण्यापूर्वी जगन मोहन रेड्डी एक यशस्वी उद्योजक होते. परंतु वडिलांच्या अकाली निधनामुळे त्यांचे धैर्य खचले. जगन मोहन रेड्डींना विश्वास होता की काँग्रेस पक्षाला आंध्रप्रदेशमध्ये मजबूत करण्यासाठी त्यांच्या वडीलांनी दिवस रात्र मेहनत घेतली होती त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलाला पक्षात विषेश स्थान मिळेल. परंतु, असे झाले नाही. वाय.एस.आर यांच्या निधनानंतर पक्षातील नेते जगन मोहन रेड्डींना आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री करा अशी मागणी करु लागले. मात्र, पक्षातील वरीष्ठांनी या मागणीकडे संपूर्ण दुर्लक्ष केले. हीच ती वेळ होती जेव्हा जगन मोहन रेड्डींकडे दोन पर्याय होते. पहिला पक्षातील वरीष्ठांचा निर्णय मान्य करा आणि शांत बसा. दुसरा वडिलांच्या लोकप्रियतेला जमेची बाजू समजून स्वतःचा पक्ष स्थापन करा. यावेळी जगन मोहन यांनी दुसरा पर्याय निवडला आणि जन्म झाला वाय.एस.आर काँग्रेस पक्षाचा. आपल्या वडिलांच्या नावाने त्यांनी पक्ष स्थापन केला.
आई आणि बहिनीचा झाला अपमान-
ही गोष्ट आहे 2010 सालची ज्यावेळी जगन मोहन रेड्डींची आई विजयालक्ष्मी आपली मुलगी शर्मीला रेड्डी सोबत सोनिया गांधी यांना भेटायला दिल्लीला गेल्या होत्या. असे म्हटले जाते की वाय.एस.आर रेड्डी आणि राजीव गांधी यांच्यात घनिष्ठ संबंध होते. त्यामुळे विजया लक्ष्मी यांना असे वाटत होते की सोनिया गांधी त्यांचे म्हणणे गांभिर्याने घेतील. परंतु, काँग्रेसकडून सकारात्मक प्रतिसाद मिळण्यासाठी प्रचंड वेळ लागल्यानंतर त्यांचा अपेक्षाभंग झाला. विजयालक्ष्मी यांना वाटत होते की पतीच्या मृत्यूनंतर आपल्या मुलाला पक्षात काही सन्माननीय पद मिळावे. पण त्याचा काही फारसा उपयोग झाला नाही. सोनिया गांधीशी जेव्हा भेट झाली तोपर्यंत त्यांच्या काँग्रेस पक्षाकडून अपेक्षा मावळल्या होत्या. आपल्या आई आणि बहिणीचा पक्षाने केलेला अपमान जगन मोहन रेड्डींना सहन झाला नाही. त्यामुळे त्यांनी नवीन पक्ष सुरु करण्याचा निश्चय केला.
खऱ्या अर्थाने राजकीय प्रवासाला सुरुवात झाली, पोटनिवडणुकीत 15 आमदारांचा दणदणीत विजय-
वाय.एस.आर काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यानंतर काँग्रेसमधून 18 आमदार नव्या पक्षात आले. यानंतर या 18 जागांसाठी 2012 साली पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीचा निकाल धक्कादायक होता कारण या निवडणुकीत जगन मोहन यांच्या पक्षाने 18 पैकी 15 जागांवर वीजयश्री प्राप्त केली होती. त्यानंतर ते सलग आंध्रप्रदेशाच्या राजकीय वर्तुळात आपली जागा तयार करण्यासाठी संघर्ष करत राहिले. दरम्यान, त्यांना तुरुंगातही जावे लागले. 16 महिने ते तुरुंगात होते त्यांच्यावर प्रमाणापेक्षा जास्त संप्ती बाळगल्याचा आरोप होता. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पुन्हा एकदा ते जनसेवेत रुजू झाले. चंद्राबाबू नायडू सरकार विरोधात त्यांनी पदयात्रा सुरु केली. वडिलांसारखीच जगन मोहन यांना राज्यातील लोकांना आणि त्यांच्या प्रश्नांना समजून घेण्याची संधी मिळाली. आता ते सत्तेच्या शिखरावर आहेत. 2019 च्या निवडणुकीनंतर आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान होण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण झाले. आता आंध्रप्रदेशमध्ये रेड्डी हे केवळ नाव तर ब्रँड आहे आणि कोरोना काळात महाराष्ट्रातही या ब्रँडने मदत करत कमाल केली यात काहीच शंका नाही.