गोपीनाथ मुंडे देखील होते काँग्रेसच्या वाटेवर..

राज्यात निवडणुकांच्या दरम्यान संधी मिळाली नाही किंवा अनेक कारणांवरुन नेते मंडळी आपला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करताना दिसतात. अनेकदा वरीष्ठ नेत्यांच्या मुलांचा यामध्ये प्रामुख्याने समावेश असतो. राज्यात अशीही काही राजकीय घराणी आहेत ज्यांच्या एकाच घरात दोन पक्षांचे नेते आहेत. एकाच कुटुंबात दोन पक्ष हे महाराष्ट्राला नवीन नाही. तसेच अनेक वर्ष पक्षात राहूनही संधी मिळाली नाही म्हणून उतार वयात पक्षांतर करणारे महारथी देखील तितकेच आहेत. तर हा किस्सा आहे भाजपाचे विश्वासू आणि महाराष्ट्रात भाजपा विस्तारात ज्यांचे मोलाचे योगदान आहे त्या दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या काँग्रेस पक्ष प्रवेशाचा…

2011 साली गोपीनाथ मुंडे महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रीय होते. पण त्या काळी विरुद्ध नितीन गडकरी असा संघर्ष त्याकाळी टिपेला गेला होता. तशी या वादाला अनेक वर्षांची किनार होती. 1995 साली शिवसेना भाजपाचा सरकार महाराष्ट्रात आले होते. शिवसेना-भाजपाचे सरकार राज्यात आणण्यात सर्वात मोलाचा वाटा होता तो प्रमोद महाजन यांचा. प्रमोद महाजनांना राज्यात युतीचे शिल्पकार असे संबोधले जायचे. त्यावेळी आलेल्या सरकारमध्ये राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची धुरा गोपींनाथ मुंडेंकडे सोपविण्यात आली होती. याच सरकारमध्ये नितीन गडकरी हे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री होते. या काळात त्यांचीही लोकप्रियता वाढली होती. त्यामुळे मुंडे विरुद्ध गडकरी हा सुप्त संघर्ष पाहायला मिळत होता. मात्र, 2006 साली प्रमोद महाजन यांची हत्या झाली आणि यानंतर भारतीय जनता पक्षाची राज्यातली समीकरणे बदलली. त्यावेळी महाजनांशिवाय मुंडे पक्षात एकाकी पडले आहेत असे चित्र निर्माण झाले.

गडकरींची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड-

भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन गडकरी यांची 2009 साली निवड झाली आणि मुंडे, गडकरी वाद विकोपाला गेला. भाजपाची सर्व सुत्रे गडकरींच्या हाती गेल्यामुळे मुंडे समर्थकांमध्ये नाराजीचे चित्र तयार झाले. त्यामुळे मुंडेंकडे पक्ष दुर्लक्ष करत आहे त्यांना पक्षाकडून डावलले जात आहे असेही आरोप समर्थकांकडून केले जावू लागले. तसेच बहुजन असल्यामुळे मुंडेंना पक्ष अशी वागणूक देत असल्याचे अनेक समर्थक म्हणत होते.

पुणे भाजपा शहराध्यक्ष निवडीवर मुंडेंची नाराजी-

गडकरी, मुंडे सुप्त  संघर्ष सुरु असतानाचा पुणे भाजपा शहराध्यक्ष निवडीत 2011 साली विकास मटकरी यांना पक्षाकडून संधी देण्यात आली. परंतु, मुंडे गटाकडून योगेश गोगावले यांना संधी मिळावी यासाठी आग्रह होता मात्र असे झाले नाही. यामुळे गोपीनाथ मुंडे नाराज झाले. मुंडेची एक खासियत म्हणजे ते नाराज झाले तर स्वतःचा फोन बंद करुन ठेवत असतं. त्यावेळी ही असेच झाले. मुंडे नॉट रीचेबल झाले त्यानंतर पक्षातील इतर नेत्यांनी त्यांची समजूत काढण्यासाठी त्यांना फोन करायचा प्रयत्न केला. मात्र गडकरी राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यामुळे आपल्यावर अन्याय होतोय असे केवळ समर्थकांचीच नव्हे तर खुद्द मुंडेंची धारणा झाली होती. त्यामुळे त्यांनी भाजपा सोडण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगतात.

नाराज मुंडेंनी घेतली विलासराव देशमुखांची भेट-

पक्षातील नव्या हालचालींमुळे नाराज असलेल्या मुंडेंनी आपले मित्र आणि काँग्रेसचे केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांची भेट घेतली. हि भेट गुप्त असली तरी मिडीयामुळे आणि सुत्रांमुळे काही फार काळ गुप्त राहू शकली नाही. त्यामुळे गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का? अशा चर्चेला पेव फुटले. त्यातच  महाराष्ट्राचे तात्कालीन मुख्यमंत्री पथ्वीराज चव्हाण तातडीने दिल्लीला गेले आणि त्यांनी अहमद पटेल यांची भेट घेतली. त्यामुळे गोपीनाथ मुंडे हे लवकर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असून त्यांना आणि त्यांच्या समर्थकांना राज्यात 2 आणि केंद्रात 2 मंत्री पदे दिली जातील अशी चर्चा रंगली.

मुंडे तुम्ही भाजपातच थांबा, पवारांचा सल्ला-

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गोपीनाथ मुंडेंना कॉंग्रेसमध्ये प्रवेश करु नका असा सल्ला दिला होता. याबाबत मुंडेंच्या निधनानंतर शिवसेना मुखपत्र सामनामधून खुलासा करण्यात आला. सामनाचे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांनी भाजपात मुंडे नाराज असताना त्यांनी शरद पवारांची भेट घेऊन या बाबत सल्ला मसलत केल्याचे म्हटले होते. त्यावेळी त्यांनी भाजप सोडून कॉंग्रेसमध्ये जावे की नाही याबद्दल सल्ला मागितला होता. “भाजपा तुमच्या सर्व मागण्या मान्य करेल. पक्षात रहा, असे पवार यांनी मुंडेंना सांगितले. पक्षातील गटबाजीमुळे मुंडे नाराज होते. मुंडे यांचे संभाव्य बंड रोखण्यासाठी पवारांनी भाजपा अध्यक्ष राजनाथ सिंह यांना भेटण्याचा सल्लाही त्यांना दिला होता. नंतर मुंडे भाजपामध्येच राहिले, त्यांनी दृढ निश्चय केला आणि लोकसभेची निवडणूक जिंकली त्यामुळे निधन होण्यापूर्वी नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळाले होते.

गोपीनाथ मुंडे भाजपात थांबण्यामागे बाळासाहेबही होते कारणीभूत –

दरम्यान मुंडेंनी ज्या नेत्यांच्या भेटी घेतल्या त्यापैकी एक होते बाळासाहेब ठाकरे. मुंडे आणि बाळासाहेबांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. तसेच त्यांचे मातोश्रीवर येणं-जाणं होतं. त्यामुळे त्यांनी बाळासाहेबांना भेटून मनातली जी खदखद आहे ती व्यक्त केली. पक्षात आपली घुसमट होत असल्यामुळे आपण पक्ष सोडत असल्याचे त्यांनी बाळासाहेबांना सांगितले. मुंडेचे सर्व ऐकून घेतल्यानंतर निघत असताना बाळासाहेबांनी मुंडेच्या कपाळावर भगवा टिळा लावत गोपीनाथराव तुमच्या कपाळावर भगवा शोभतो त्यामुळे तुम्ही भाजपातच थांबा असा सल्ला बाळासाहेंबानी मुंडेंना दिला. पुढे मुंडेंनी बाळासाहेबांचा हा सल्ला ऐकला. ते दिल्लीला गेले त्यांनी पक्षाचे परीष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांची भेट घेतली आणि विषेश करुन त्यांनी सुषमा स्वराज यांची भेट घेतली. स्वराज यांच्याशी चर्चा केल्यानंतर मुंडेंची नाराजी काही प्रमाणात दूर झाली. बाळासाहेबांचा सल्ला स्वराज यांच्याशी चर्चा हे सर्व झाल्यानंतर मुंडे यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय मागे घेतला. स्वराज यांच्या बंगल्या बाहेर एक पत्रकार परिषद घेत आपण पक्ष सोडत नसल्याचे मुंडे यांनी जाहीर केले. मुंडेची ही आठवण त्यांचे एक जुने सहकारी पाडुंरंग फुंडकर यांनी महाराष्ट्राच्या विधान परिषदेत सांगितली. 2014 ला गोपीनाथ मुंडेंच्या अपघाती निधनानंतर महाराष्ट्राच्या विधानसभेत त्यांना ही आठवण सांगताना हुंदका आवरला नाही. त्यावेळी त्यांनी हा प्रसंग सांगितला होता. हल्लीच एकनाथ खडसे यांनी भाजपा सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. केवळ खडसेच नव्ह तर या त्या कारणाने पक्षांतर करणारे अनेक नेत राजकीय वर्तुळात पाहायला मिळतात. मात्र, वरीष्ठांच्या सल्ल्याचा मान ठेवून पक्षात राहणारे मुंडेसारखे नेते क्वचितच पाहायला मिळतात.