आण्णा हजारेंनी 5 एप्रिल 2011 रोजी दिल्लीतील जंतर-मंतरवर उपोषणाला सुरुवात केली. जन लोकपाल विधेयकाच्या मागणीने सुरू झालेले हे उपोषण मोठे आंदोलन बनले. 80 च्या दशकात किंवा त्यानंतरच्या काळात जन्मलेल्या लोकांनी प्रथमच इतकी मोठी चळवळ पाहिली असेल. आजही हे आंदोलन आण्णांच्या नावाने ओळखले जाते. या संपूर्ण चळवळीमागील कोअर टीम ही इंडिया अगेंस्ट करप्शन नावाची मुख्य समिती होती. आता या आंदोलनाला जवळपास दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. परंतु, या आंदोलनात सहभागी असणारे लोक सध्या काय करतात. त्यांचे पुढे काय झाले हे आज आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
आण्णा हजारे-
तेव्हाची भूमिका- त्या काळात या चळवळीचा सर्वात मोठा चेहरा म्हणजे आण्णा हजारे होय. आण्णांचे सामाजिक कार्य मोठ्या प्रमाणात असल्यामुळे समाजात त्यांच्याबद्दल लोकांना प्रचंड आदर आहे. डिसेंबर 2010 मध्ये India Against Corruption या चळवळीशी ते जोडले गेले. दररोज वाचायला मिळणाऱ्या भ्रष्टाचाराच्या बातम्यांनी कंटाळलेल्या लोकांनी आण्णांमध्ये या काळातल्या गांधीजींची छबी पाहिली. त्यामुळे दरम्यान आण्णांनी केलेल्या उपोषणाला जनतेने प्रचंड पाठिंबा दिला.
सध्या काय करतात – ज्या दिवशी चळवळ फुटली आणि एक राजकीय पक्ष स्थापन झाला त्या दिवसापासून आण्णांनी अरविंद केजरीवाल आणि त्यांच्यासमवेत आयएसी मधील गटासमोर अशी अट घातली होती की तुम्ही कधीही ‘इंडिया अगेंस्ट करप्शन’ या चळवळीचा वापर राजकीय हेतूने करु नये. यानंतर आपबरोबर गेलेले लोक आयएसी पासून वेगळे झाले. सध्या आण्णा त्यांच्या महाराष्ट्रातील राळेगणसिद्धी या गावात राहतात.
अरविंद केजरीवाल-
तेव्हाची भूमिका – अरविंद केजरीवाल हे पहिल्या दिवसापासून या चळवळीशी जोडले गेले होते. भारतीय महसूल सेवा अधिकारी असलेले मॅगसेसे पुरस्कार विजेते तथा माहिती अधिकार कार्यकर्ते, केजरीवाल यांचा जनसंपर्क उत्कृष्ट होता. याचा चळवळीला उत्तम फायदा झाला.
सध्या काय करतात – 2012 मध्ये त्यांनी आम आदमी पक्षाची स्थापना केली. 2013 मध्ये ते 49 दिवस दिल्लीचे मुख्यमंत्री होते. 2015 मध्ये पुन्हा मुख्यमंत्री झाले आणि आपला कार्यकाळ पुर्ण केला. 2020 मध्ये पुन्हा ते निवडणूक जिंकले आणि सध्या दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावर ते कार्यरत आहेत.
किरण बेदी-
तेव्हाची भूमिका – आण्णा हजारे यांचे नाव चळवळीशी जोडले गेल्यामुळे लोकांमध्ये एक आत्मविश्वास निर्माण झाला होता. परंतु, या चळवळीला अद्याप लोकांच्या मनातला ठोस चेहरा मिळालेला नव्हता. ते काम किरण बेदी यांच्या चळवळीतील सहभागामुळे पूर्ण झाले. देशातल्या प्रत्येक घरात किरण बेदी यांना ओळखले जात होते. याचा फायदा पुढे चळवळीला झाला.
सध्या काय करतात – 2015 मध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. दिल्ली विधानसभा निवडणुकीतही त्या मुख्यमंत्रीपदाच्या दावेदार म्हणूनही लोकांसमोर आल्या. परंतु पार्टीला पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर बेदी यांना 2016 मध्ये पडुचेरीचे राज्यपाल बनविले गेले. फेब्रुवारी 2021 पर्यंत त्या या पदावर कार्यरत होत्या.
प्रशांत भूषण-
तेव्हाची भूमिका- प्रशांत भूषण त्यावेळीही एक सुप्रसिद्ध वकील होते. लोकपाल विधेयक तयार करण्यात त्यांची महत्वाची भूमिका होती. त्यावेळी सरकारबरोबर झालेल्या सर्व चर्चेत आयएसीच्या वतीनेही ते सहभागी झाले होते. त्यानंतरच्या आम आदमी पार्टीच्या स्थापनेतही भूषण यांचा मोलाचा वाटा होता. त्याचबरोबर 2013 च्या दिल्ली निवडणुका आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकीत ते पक्षाच्या महत्वाच्या नेत्यांपैकी एक होते. पण 2015 च्या विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर तिकीट वाटपासंदर्भात गंभीर आरोप केले. यानंतर एप्रिल महिन्यात प्रशांत भूषण यांना पक्षविरोधी काम केल्याचा आरोप करत पक्षातून काढून टाकले.
सध्या काय करतात – सुप्रीम कोर्टाचे वकील आहेत. सरकार आणि न्यायालयीन व्यवस्थेविषयीच्या त्यांच्या टीकांमुळे ते आजही चर्चेत असतात.
स्वाती मालीवाल-
तेव्हाची भूमिका- सदर चळवळीच्या कोर कमिटीची सदस्य होत्या.
सध्या काय करतात –आप पक्षाच्या स्थापनेनंतर पक्षात सामील झाल्या. 2015 मध्ये त्या दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा झाल्या. या पदावर विराजमान होणारी त्या पहिली तरुणी होत्या. आजही त्या पदावर कार्यरत आहेत.
श्री श्री रविशंकर-
तेव्हाची भूमिका- श्री श्री रविशंकर यांनी चळवळीला पाठिंबा देण्यापासून वेगवेगळ्या प्रकारची सर्व मदत केली. त्यांच्या अनुयायांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे चळवळीला याचा मोठा फायदा झाला.
सध्या काय करतात- अध्यात्मिक गुरू म्हणून समाजात त्यांची ओळख आहे. तसेच आर्ट ऑफ लिव्हिंग नावाची संस्था ते चालवितात.
मनीष सिसोदिया-
तेव्हाची भूमिका – अरविंद केजरीवाल यांनीच सुरुवातीला मनीष सिसोदियांना इंडिया अगेंस्ट करप्शनच्या चळवळीशी जोडले होते. सिसोदिया आणि केजरीवाल यांची पुर्वीपासून ओळख होती. आयएसीशी जोडले गेल्यानंतर त्यांनी सोर्स, मॅनेजमेंट पासून अनेक कामे सांभाळली.
सध्या काय करतात- नंतर जेव्हा केजरीवाल यांनी राजकीय पक्ष स्थापनेची घोषणा केली तेव्हा सिसोदिया त्यांच्याबरोबर राहिले. आम आदमी पार्टीची स्थापना केली. सध्या ते दिल्लीचे उपमुख्यमंत्री आहेत.