‘हिरा है सदा के लिये’
पंजाब नॅशनल बँकेला 2018 साली 14000 कोटी रुपयांना फसवूण फरार होणारे मेहुल चोकसी हे व्यक्तीमत्व देशात कुणाला माहिती नसेल तरच नवल. प्रसिद्ध हिरे व्यापारी असलेल्या मेहूल चोकसी यांनी या घोटाळ्यानंतर 2018 साली भारत सोडला. त्यानंतर ते वेगवेगळ्या ठिकाणी राहू लागले आणि सध्या डॉमिनिका बेटांवर तिथल्या पोलिसांनी त्यांना पकडले आहे. इतके प्रसिद्ध असलेले हिरे व्यापारी कशा प्रकारे फरार गुन्हेगार कसे झाले. करोडोंचा व्यापार देशात आणि देशाबाहेर आपल्या कंपनीच्या अनेक शाखा उघडणारे मेहुल चोकसी कसे ठरले गुन्हेगार याविषयी आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. तसेच आता भारत सरकार मेहुल चोक्सीला भारतात आणून शकेल का? हे ही जाणून घेऊ…
भारतातून पळून गेल्यानंतर मेहुल चोकसी अँटिग्वा बेटावरील एका कॅरेबीयन देशाचे नागरिक झाले होते. पण 23 मे ला रात्रीचे जेवण झाल्यानंतर ते अंटिग्वाला आपल्या घरी नसल्याचे त्यांचे कुटुंबीय आणि घरातील नोकरांच्या लक्षात आले. घरच्यांनी या संदर्भात पोलिसांत तक्रार देखील केली आणि त्यानंतर शोध लागला मेहुल चोकसींच्या सध्याच्या ठावठिकाणाचा. सुरुवातीला अँटिग्वाच्या पोलिसांना चोकसी यांची कार मिळाली परंतु त्यांचा ठाव ठिकाणा लागला नाही. हरवलेल्या माणसांच्या शोधासाठी इंटरपोलची जी यलो नोटीस असते ती जारी करण्यात आली आणि या नोटीसला उत्तर मिळाले शेजारच्या डॉमिनिका बेटावरील पोलिसांकडून. त्यांनी कळवले की मेहूल चोक्सीला त्यांच्या हद्दीत अवैध मार्गाने प्रवेश करताना पकडण्यात आले आहे. आपल्या गर्लफ्रेंड ला घेवून चोकसी डॉमिनिका बेटावर जात होता अशीही बातमी काही आंतरराष्ट्रीय मिडीयाने प्रसिद्ध केली होती. सध्या मेहुल चोकसी त्रयस्थ देशात पोलिसांच्या ताब्यात आहे हे कळल्यानंतर भारतातही हालचाली सुरु झाल्या. त्यांना भारतात आणण्यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या संमतीने एक जेटही भारतातून डॉमिनिका बेटावर रवाना करण्यात आल्याचे वृत्तही आऊटलूक ने प्रसिद्ध केले होते. पण त्यासाठी कैद्याच्या प्रत्यार्पणाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागते आणि सध्या डॉमनिका कोर्टाने अशा प्रकारच्या प्रत्यार्पण प्रक्रियेच्या कामाला सध्या स्थगिती देण्यात आली आहे. यासंदर्भात चोकसी यांना जबदस्तीने डॉमेनिकाला नेण्यात आले असल्याचा दावा त्यांच्या वकीलाने केला आहे.
चोकसींच्या वकिलाच्या म्हणण्यानुसार डॉमनिकामध्ये चोकसी यांना पोलीस कस्टडीत जबर मारहाण झाली आहे. त्यांचा एक डोळा सुजला आहे. त्यांच्या चेहऱ्यावर तसेच हातावर चटके दिल्याच्याही खूणा आहेत. मेहुल यांनी दिलेल्या माहितीनुसार ते अँटिग्वाच्या जॉली हार्बरवर होते. पण, तिथून त्यांना जबरदस्तीने डॉमिनिका आणण्यात आलं. जबरदस्ती करणारी माणसं भारतीय आणि अंटिग्वाची असावीत असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
सदर कोर्टकचेरीच्या भानगडी तसेच आंतरराष्ट्रीय प्रत्यार्पणाचे जटील कायदे पाहता खरंच चोकसीला भारतात आणता येईल का हे आत्ताच सांगणे कठीण आहे. पण त्यापूर्वी एक प्रसिद्ध व्यापारी मेहुल चोकसी चा फरार गुन्हेगार होण्यापर्यंतचा हा प्रवास कसा झाला हे थोडक्यात…..
घोटाळेबाज उद्योजक-
2018 पर्यंत मुंबईच्या सगळ्या पेज थ्री पार्टीमध्ये मेहुल चोकसी आणि त्यांचा भाचा निरव मोदी आघाडीवर होते. विषेश म्हणजे हिरे आणि मौल्यवाण खड्यांची मोठी प्रदर्शने, लिलाव इथे त्यांची उपस्थिती एखाद्या सेलिब्रेटीसारखी असायची. मुळात गितांजली जेम्स ही 1960 पासून पिढीजात असलेली कंपनी कॉमर्स ग्रॅज्युएट असलेल्या मेहुल चोकसी यांनी वडिलांच्या मृत्यू नंतर 1985 मध्ये आपल्या ताब्यात घेतली. एरव्ही फक्त हिरे पॉलिशींग आणि कच्च्या हिऱ्यांच्या व्यापारात असलेल्या कंपनीला मेहुल चोकसी यांनी गितांजली जेम्सच्या नावाने कॉर्पोरेट लुक दिला. दागिने घडविणे आणि त्यांची विक्री या व्यवसायातही ते उतरले. आपला भाचा निरव मोदीला हाताशी धरुन देशभरात आणि देशाच्या बाहेर दुबई आणि आखाती देश, अमेरीका इथही त्यांनी गितांजली जेम्सच्या शेकडो शोरूम उघडल्या. गिली, नक्षत्र, अस्मि, संगिनी, निझान , परिणिता हे सर्व ब्रँड आणि ही ‘हिरा है सदा के लिए’ ही कॅच लाइन गितांजलीनेच आपल्याला दिली. त्यांनी हळूहळू आपला ब्रँड इतका मोठा केला की त्यांचे जास्त किमतीचे दागिने सुद्धा लोक विश्वासाने खरेदी करत होते. देशातील हिरा व्यापार हा मुळातच असंघटीत आहे. त्यावर कोणाचाच वचक नाही. याचाच फायदा घेऊन चोकसी यांना मिळकतीचे वेगवेगळे मार्ग दिसू लागले आणि इथेच सर्व बिघडल.
गितांजली ज्वेलरी रिटेल लिमिटेड-
गितांजली जेम्सची एक उपकंपनी गितांजली ज्वेलरी रिटेल लिमिटेडचे माजी व्यवस्थापकीय संचालक संतोष श्रीवास्तव यांनी एका वृत्तवाहिनीला माहिती देताना सांगितले, “2011 ते 2012 पर्यंत सर्व अगदी सुरळीत असल्याचे भासत होते. मात्र, हळूहळू मला असं जाणवू लागल की चोकसी यांना कंपनी मोठी करण्या ऐवजी फंड जमा करण्यात रस आहे. याच दरम्यान बँक आणि फ्रेन्चायझींमधूनही कंपन्यांमध्ये पैसा येत असल्याचे माझ्या लक्षात आले. कागदोपत्री आमच्याकडे माल होता. पण प्रत्यक्षात फ्रेन्चायझींना पाठवण्यासाठी आमच्याकडे माल नव्हता”. पुढचा धोका ओळखून श्रीवास्तव यांनी गितांजली जेम्सला सोडचिठ्ठी दिली.
2014 साली उघडकीस आला भारतीय कॉर्पोरेट इतिहासातला सगळ्यात मोठा 14000 कोटींचा पीएनबी घोटाळा-
7 जानेवारी 2018 च्या मध्यरात्री मेहुल चोकसी आणि त्यांची पत्नी यांनी मुंबईहून अंटिग्वाला जाण्यासाठी विमान पकडले होते. आपली प्रकृती ठीक नसल्याचे कारण त्यावेळी त्यांनी दिले होते. तर दुसरीकडे भाचा निरव मोदी लंडनच्या आपल्या घरी स्थिरावलेला होता. त्यानंतर 15 फेब्रुवारी 2018 ला पंजाब नॅशनल बँकेने त्यांच्या मुंबईतल्या एकाच शाखेतून बनावट लेटर ऑफ अंडरटेकन देवून जवळपास 13,600 कोटी बनावट कर्ज उचलल्याची तक्रार मुंबई पोलिसांकडे केली.
सक्तवसुली संचालनालयाची चार्जशिट-
मेहुल चोकसी ही ग्राहक आणि कर्जदारांना फसवण्यासाठी देशभर संघटित आणि पूर्वनियोजित रॅकेट चालवणारा इसम असल्याचा आरोप आहे. पोलीस केस फेब्रुवारीमध्ये झाली परंतु बँकेत अंतर्गत तपास आणि कारवाई काही महिने आधीच सुरु झालेली असणार आहे. तिथल्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीमुळे मोदी आणि त्याचे कुटुंबीय आधीच देशातून फरार झाले होते असे अनेक तज्ञांचे मत आहे. काही देशांमध्ये परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी एक योजना आखण्यात आली आहे. तुम्ही त्या देशांमध्ये ठराविक प्रमाणात डॉलरमध्ये गुंतवणूक केलीत तर तुम्हाला त्या देशाचे नागरीकत्व मिळू शकते. अंटिग्वा देशाचे नागरीकत्व मिळविण्यासाठी मेहुल चोकसीनीही हेच केल. मात्र, त्यांनी हे पळून जाण्यापूर्वी 1 वर्ष म्हणजे नोव्हेंबर 2017 मध्ये केले असावे असेही जाणकारांचे मत आहे. तर हे मेहुल चोकसी सध्या डॉमिनिका बेटावर पोलिसांच्या ताब्यात आहेत. तर त्यांचा भाचा निरव मोदी लंडन पोलिसांच्या ताब्यात आहे. या प्रकरणात पुढे काय होणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.