नवी मुंबई येथे तयार होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावाचा वाद दिवसेंदिवस वाढताना पहायला मिळत आहे. या विमानतळाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आंतराष्ट्रीय विमानतळ असे नाव देण्यात यावे अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. तर दुसरीकडे इथल्या स्थानिकांनी शेतकरी कामगार पक्षाचे दिवंगत नेते दि.बा. पाटील यांचे नाव या विमानतळाला देण्यात यावे अशी मागणी केली आहे. स्थानिक नागरिक आणि नेते केवळ मागणी करून थांबलेले नाहीत तर त्यांनी तशा आशयाचे फलक देखील विभागात लावलेले आहेत. स्थानिकांच्या या मागणीला विरोधी पक्ष भाजपाने देखील पाठिंबा दिला आहे.
विमानतळाच्या नावावरून सुरू झालेल्या या वादाकडे नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी शिवसेना विरुद्ध भाजप असे पाहिले जात आहे. सध्या राज्याच्या राजकारणात या दोन पक्षांच्या मधून विस्तव देखील जात नाही आहे. परंतु, महापालिका निवडणुकीच्या धर्तीवर सध्या त्यांना वादासाठी हा मुद्दा मिळालेला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थानिक नेत्यांची बैठक घेऊन त्यांच्यामध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, या बैठकी नंतरही आंदोलन सुरू राहिल्याने सदर बैठकीचा काही विशेष परिणाम सध्या झालेला दिसत नाही.
भूमिपुत्रांना बाळासाहेबांचे नाव नकोच
बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची चर्चा होताच स्थानिक भूमिपुत्रांनी एकत्र येऊन या ठिकाणी आंदोलन केले. जागा हस्तांतरणापासून अनेक वेगवेगळ्या विषयांवर सुरुवातीपासूनच हे विमानतळ चर्चेचा विषय ठरले होते. त्यात आता नामकरणाच्या वादाची भर पडली आहे. दि. बा. पाटील हे पनवेल रायगड भागातील शेतकरी पक्षाचे एक मोठे नेते होते तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेत एकेकाळी ते विरोधी पक्षनेते राहिले आहेत.
प्रथम एकनाथ शिंदे यांनी केली मागणी
विमानतळाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी एकनाथ शिंदे यांच्या नगर विकास मंत्रालयाने प्रथम केली होती. तसेच नगर विकास मंत्रालयाने सिडकोला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असे नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे असा प्रस्ताव ठेवण्याचा सल्ला दिला. सिडकोच्या संचालक मंडळाने तसा प्रस्ताव मंजूर करून राज्य मंत्रिमंडळाकडे दिला आहे. राज्य मंत्रिमंडळाने जर हा प्रस्ताव मंजूर केला तर तो पुढील मंजुरीसाठी केंद्राकडे जाईल. राज्य मंत्रिमंडळाने या नावाला मंजुरी देण्याआधी नवी मुंबईमध्ये मात्र या नावावरून राजकारण होताना दिसत आहे. तसेच स्थानिक त्याला विरोध करताना दिसत आहेत.
दि. बा. पाटील यांचे कार्य
दि. बा. पाटील यांनी नवी मुंबईच्या निर्मिती वेळेस, जेएनपीटी सारख्या बंदरांच्या उभारणीच्या वेळी स्थानिक नागरिकांना हक्क आणि मोबदला मिळवून देण्यासाठी निर्णायक लढा दिला होता. परंतु या विभागात कोणत्याही प्रकल्पाला त्यांचे नाव अद्याप देण्यात आलेले नाही. म्हणून ह्या विमानतळाला पाटील यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. त्यासाठी आंदोलन देखील केली जात आहे. भाजपाच्या स्थानिक आमदारांनी या आंदोलनामध्ये उडी घेतली आहे. तसेच भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देखील पाटील यांच्या नावाला सहमती दर्शवली आहे. केवळ इतकेच नाही तर मनसेने देखील या प्रकल्पाला पाटील यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी यापूर्वीच केली आहे. सध्या पनवेलचे भाजपा आमदार प्रशांत ठाकूर हे देखील या आंदोलनात सहभागी आहेत.
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी मागणी केल्यानंतर सिडको ने इतक्या घाईघाईने प्रस्ताव ठेवण्यामागे काय कारण असेल? असा सवाल उपस्थित होत आहे. तर दुसरीकडे गेल्या आठ वर्षांपासून या आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्थानिक नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी केली जात आहे. तर बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव अचानक कसा आला. अजून या विमानतळाचे काम पूर्ण व्हायला तीन वर्षांचा अवधी आहे. म्हणून आम्ही पूर्वी प्रस्ताव केला नव्हता. परंतु, यांनी इतक्या घाईने सर्व केले. स्थानिकांच्या भावना समजून घेतल्या नाहीत. असे भाजपा आमदार प्रशांत ठाकूर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले.