मेक्सिकोच्या एका राज्यात अचानक खड्डा पड्ल्याने उडाली लोकांची झोप..

निसर्गाच्या उद्रेकामुळे अनेक ठिकाणी अनेक नवनवीन गोष्टी तयार झालेल्या आपल्याला पाहायला मिळातात.असाच प्रकार सध्या मेक्सिकोमध्ये एका खड्ड्याच्या रुपात पाहायला मिळत आहे. मेक्सिकोच्या पुएब्ला राज्यातल्या सांता मारिया जॅकटेपेक (Santa Maria Zacatepec) शहरात एक मोठा खड्डा पडला आहे. हा खड्डा शहरातील एका शेतकर्‍याच्या शेतात अचानक नैसर्गिक रित्या तयार झाला असून या खड्ड्याच्या जवळ त्या शेतकऱ्याचे घरही आहे. या खडड्याची रुंदी जवळपास 60 मीटर असल्यामुळे या शेतकऱ्याचे घरही या खड्ड्यात पडण्याची शक्यता आहे.

पुएब्ला राज्याचे गव्हर्नर मिगुएल बार्बोसा हूर्टा म्हणाले की, सांता मारिया जॅकटेपेक शहरात असलेला हा खड्डा 20 मीटर खोल आहे. ते म्हणाले की या खड्ड्याजवळ राहणाऱ्या कुटुंबाला येथून हलविण्यात आले आहे. तसेच आतापर्यंत यामुळे कुणालाही इजा झालेली नाही. पण लोकांना या खड्ड्यापासून दूर रहाण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

मेक्सिकोचे पर्यावरण सचिव बीट्रिज मॅनरीक यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा हा खड्डा प्रथम तयार झाला तेव्हा त्याची त्रिज्या केवळ पाच मीटर होती. परंतु काही तासातच ती वेगाने पसरण्यास सुरुवात झाली. हे दोन कारणांमुळे घडत असल्याचे त्याने सांगितले. प्रथम, शेतातील जमीन मऊ झाल्यामुळे आणि दुसरे म्हणजे जमिनीतून पाणी काढून टाकल्यामुळे माती भुसभूशीत झाल्यामुळे. राष्ट्रीय जल आयोगासह सार्वजनिक संस्थाचे अधिकारी या खड्ड्याची तपासणी करणार आहेत. त्यासाठी मातीचे नमुने एकत्रित करुन अभ्यास केला जाईल. 

सीएनएनच्या वृत्तानुसार, शनिवार 5 जून 2021 रोजी सांता मारिया जॅकटेपेक शहरात हा खड्डा प्रथम दिसला. यानंतर, त्यात पाणी भरण्यास सुरवात झाली आणि अशाप्रकारे तो पसरतच राहिला. मात्र, खड्डा सर्वांसाठी सध्या कुतुहलाचा विषय ठरत असल्यामुळे हे पाहण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी जमत आहे.

यापूर्वी, जानेवारी 2021 मध्ये, दक्षिण इटलीमध्ये असाच एक खड्डा तयार झाला होता. अनेक गाड्या या खड्ड्यात गेल्या होत्या आणि जवळच्या कोविड वॉर्डमधून रुग्णांना बाहेर काढावे लागले होते.