पेशवे घराण्यातील सदाशिवराव भाऊ हे व्यक्तिमत्व अवघ्या महाराष्ट्रालाच काय देशाला परिचित आहे. अत्यंत धाडसी आणि कर्तुत्ववान पुरुष म्हणून त्यांची इतिहासात नोंद आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या आणि इतिहासाशी संबंध असलेल्या अनेकांना सदाशिवराव भाऊंच्या कारकीर्दीविषयी चांगलीच माहिती आहे. त्यापलीकडे जाऊन टेलिव्हिजनवर आलेल्या स्वामिनी मालिकेमुळे पेशव्यांचा इतिहास सर्वसामान्य लोकांच्या दृष्टिक्षेपात आला. त्यानंतर अनेक चित्रपट देखील काढले गेले पण आम्ही तुम्हाला सदाशिव भाऊ पेशवे यांच्या कारकीर्दीविषयी थोडक्यात सांगणार आहोत. तर गोष्ट आहे 31 ऑक्टोबर 1760 ची मराठे आणि अहमदशहा अब्दाली अगदी आमने-सामने आले होते. मराठ्यांनी अब्दालीचा अफगाणिस्तानला जाण्याचा मार्ग रोखला होता तर अब्दालीने मराठ्यांचा दिल्लीला जाण्याचा मार्ग रोखला होता. मराठ्यांनी केलेल्या तोफखान्याच्या रचनेमुळे आपला धुव्वा उडेल अशी भीती अब्दालीच्या मनात होती. कसेही करून अब्दालीला अफगाणिस्तानला परतायचे होते.
मराठ्यांनी चौकोनी स्वरूपात सैन्यरचना केली होती. मराठ्यांच्या डाव्या आणि मधल्या फळीने अब्दालीचा प्रतिकार केला होता. दुपारपर्यंत मराठा सैन्याने अगदी जोरदार बाजी मारली. परंतु, चार तासानंतर अब्दालीने पळून आलेल्या सैनिकांना हाताशी धरत दमलेल्या मराठ्यांवर जोरदार आक्रमण चढवले. इतक्यात विश्वासराव धारातीर्थी पडले. हे पाहून सदाशिवरावभाऊंनी अंबारी सोडली आणि ते घोड्यावर स्वार झाले. अंबारी रिकामी दिसताच सदाशिवराव भाऊ देखील धारातीर्थी पडले असा गैरसमज मराठा सैन्यांना झाला. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि मराठ्यांचे मनोधैर्य खचले परिणामी अगदी हातातोंडाशी आलेला विजय मराठा सैन्याने गमावला. मराठा सैन्य 50000 होते परंतु त्यांच्या सेवेसाठी आणि इतर मिळून एकूण 1 लाख सैन्य पानिपतच्या युद्धात धारातीर्थी पडले. परंतु, आपल्या मायभूमीपासून हजारो मैल दूर असलेल्या पानिपतच्या धर्तीवर आपले अतुलनीय शौर्य दाखवणारा योद्धा म्हणून सदाशिवराव भाऊंची मराठा इतिहासात सुवर्ण अक्षरात नोंद आहे.
सदाशिवराव भाऊ नक्की कोण होते?
4 ऑगस्ट 1730 साली सदाशिवराव भाऊंचा जन्म झाला. अवघे एका महिन्याचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. दहा वर्षांचे असताना पितृछत्र हरपले. पुढे त्यांचा सांभाळ त्यांची आजी राधाबाई यांनी केला. सातारला छत्रपती शाहू महाराजांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शस्त्र तसेच राजकारणाची धडे गिरवले. भाऊंनी पहिल्यांदा लढाईमध्ये नेतृत्व दाखवले ते निजामाविरुद्ध, आणि त्यावेळी त्यांनी दौलताबादचा किल्ला सर केला. हरलेला निजाम जेव्हा हात बांधून आला, तेव्हा भाऊंनी इब्राहीमखान गारदी यास निजामाकडून मागून आपल्या सैन्यात घेतले. इब्राहिम गारदिला तोफांविषयी ज्ञान होते. त्यानंतर 35 परगाणे सदाशिवराव भाऊंनी आपल्या ताब्यात घेतले. 1750 मध्ये राजाराम महाराजांकडून त्यांनी कुलमुकत्यारी मिळवली. त्याचवर्षी त्यांना कोल्हापूरच्या छत्रपतींकडून पेशवाई वस्त्रे आणि जहागिरी मिळाली. 1759मध्ये निजमाविरुद्ध लढलेल्या उदगीरच्या लढाईमुळे सदाशिवराव भाऊ पहिल्यांदा चर्चेत आले.
तोफांचे महत्व-
आधुनिक शस्त्रास्त्रांची गरज लक्षात घेऊन सदाशिवराव भाऊंनी तोफांचे महत्व ओळखले होते. बुसी या फ्रान्सच्या तोफखाण्याचा पराक्रम पाहिल्यानंतर त्यांनी तोफखान्याची रचना करण्याकडे लक्ष वेधले.
3 फेब्रुवारी 1760 उदगीरच्या लढाईत त्यांनी निजामाला पराभूत केले आणि बुऱ्हाणपूर, औरंगाबाद, विजापूर हे विभाग काबीज केले. उदगीरच्या लढाईनंतर उत्तरेकडे फौजा पाठवण्याची तयारी सुरू झाली. या लढाईसाठी रघुनाथ रावांनी 80 लाखांचे कर्ज मागितले. त्यामुळे नानासाहेब पेशव्यांनी त्यांच्या ऐवजी सदाशिवराव भाऊंना तिकडे पाठविण्याचा निर्णय घेतला. तसेच त्यांच्या सोबत तरुण तडफदार विश्वासराव यांना देखील पाठविण्यात आले. 6 लाख रुपये आणि 50 हजार सैन्य त्यांना यावेळी देण्यात आले आणि मराठा सैन्य उत्तरेकडे रवाना झाले. अहमदशाह अब्दाली म्हणजे काही मुघल नाही. ते तुर्की घोड्यांवर स्वार होतात आणि युद्ध करतात. तसेच त्यांना गनिमी काव्याचे उत्तम ज्ञान आहे असा सल्ला सदाशिवराव यांना देण्यात आला होता.
इतिहास अभ्यासकांच्या मते सदाशिवराव भाऊंना सुरजमल जाट, शुजा यांची मदत मिळण्याची शक्यता होती. तर अब्दालीला नजीब उद्दौला, बंगज, बरेली चे रोहिले यांची मदत मिळण्याची शक्यता होती. युद्ध होऊ नये यासाठी पत्रव्यवहार सुरू होता. जयपूर, जोधपूरच्या राजांनी अब्दालीला साथ देण्याचे ठरवले. सदाशिवराव भाऊंनी जर हे युद्ध जिंकले तर आपल्या डोक्यावर त्यांची सत्ता असेल हे लक्षात आल्याने अनेकांनी अफगाणिस्तानच्या अब्दालीला साथ द्यायचे ठरवले. यमुना नदीला आलेल्या मोठ्या पुरामुळे चार महिने मराठ्यांचे सैन्य एकाच ठिकाणी होते. सदाशिवराव यांनी दिल्ली काबीज करून लाल किल्ला आपल्या ताब्यात घेतला होता. एक प्रकारे तत्कालीन हिंदुस्तानवर मराठ्यांचे राज्य होते. पण पुढे पानिपत घडले आणि संपूर्ण इतिहास बदलला.
अहमदशहा अब्दालीने पानिपतच्या लढाईचे पत्राद्वारे कौतुक केल्याचे इतिहासकार सांगतात. लढाईनंतर त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना पत्र लिहिले होते. त्यामध्ये असे म्हटले होते की, हे लोक सामान्य नाहीत. मराठा सैन्याने अजोड धैर्य दाखवले. इतर वंशाच्या लोकांना हे जमले नसते. निधड्या छातीचे वीर एकमेकांसमोर ठाकले होते. त्यांनी प्रचंड मोठा संघर्ष केला. आपल्या भागापासून दूरच्या ठिकाणी अन्नधान्याची रसद संपुष्टात आली असताना मराठा सैन्याने पराक्रमाची शर्थ केली असे अब्दालीने पत्रात लिहिले होते .
सदाशिवराव भाऊंचा मृत्यू-
14 जानेवारी 1761 ला पानिपतच्या युद्धात सदाशिवराव भाऊंचा मृत्यू झाला. परंतु, हरियाणा जवळच्या रोहतक इथल्या सांघी गावातल्या स्थानिकांच्या मते सदाशिवराव भाऊ लढाई नंतरही जिवंत होते. परंतु हे असे घडले होते का? की ही केवळ एक दंतकथा आहे?
गावकऱ्यांच्या मते युद्धानंतरही ते जिवंत होते-
रोहतक शहरापासून एक साधारण 25 किलोमीटर असलेल्या सांघी गावात सदाशिवराव भाऊ यांच्या नावे एक आश्रम आहे. या आश्रमाचे नाव “डेरा लाधीवाला” असे असून याठिकाणी श्री सदाशिवरावभाऊ यांची गादी आहे. गावकऱ्यांच्या मते पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा प्रभाव निश्चित झाला आणि त्याचवेळी जखमी अवस्थेत असलेले सदाशिवरावभाऊ आपल्या घोड्यावर स्वार होऊन युद्धभूमीमधून बाहेर पडले. जखमी आणि अर्धवट शुद्धीत ते उग्राखेडी या गावात पोहचले आणि तिथून ते सोनिपथ इथल्या मोईहुड्डा या गावात आले. त्यानंतर रुखी गावात त्यांनी आसरा मागितला. 22 जानेवारी 1761 ला म्हणजे पानिपत युद्धानंतर आठव्या दिवशी ते सांघी गावात आले आणि इथल्या गावकऱ्यांनी त्यांना आसरा दिला.
इतिहासकारांच्या मते 24 फेब्रुवारी 1761 ला नानासाहेब पेशवे यांना काशीराजकडून एक पत्र आले त्यामध्ये सदाशिवराव भाऊ आणि विश्वासराव यांचे अंत्यसंस्कार झाल्याचे कळविण्यात आले होते. इतिहासकार काही म्हणाले तरी सांघी गावातील लोकांना सदाशिवभाऊंच्या इथल्या वास्तव्यावर प्रचंड विश्वास आहे. 1762 ला रोहिल्या पठाणांच्या लुटीपासून या गावाला वाचविण्यासाठी गावातल्या तरुण मुलांची एक फौज उभी केली. गावाभौवती एक खंदक खोदले आणि या पठाणांचा बंदोबस्त केला. या पठाणांशी झालेल्या लढाईत गावकऱ्यांनी सदाशिवभाऊंच्या नेतृत्वाखाली विजय मिळवला अशी माहिती या ठिकाणचे अभ्यासक देतात. लाखो मराठे सैन्य धारातीर्थी पडलेले ते पानिपत युद्ध संपूर्ण महाराष्ट्राच्या स्मरणात आहे तर दुसरीकडे बाबा भाऊनाथ महाराजांना मानणारा एक वर्ग या देशातल्या हरियाणामध्ये आहे.