वडा पाव सर्वांनी खाल्लाय, पण त्याचा इतिहास माहित आहे का?

वडा पाव.. महाराष्ट्रात जन्माला आलात, त्यातून मुंबईत राहत आहात आणि तुम्ही वडापाव खाल्ला नाही असं म्हटलं तर कोणालाही पटणार नाही. सर्वसामान्यांच्या खिशाला अगदी सहज परवडेल असा हा खाद्यपदार्थ गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत प्रत्येकजण चवीने खातो. चीज वडा, बटर वडापाव, चुरा वडापाव असे अनेक वडापाव चे प्रकार आज मुंबईतल्या विविध ठिकाणी खायला मिळतात. दादर, वरळी, परेल, प्रभादेवी, गिरगाव यांसारख्या अनेक ठिकाणी वडापाव आणि वडापावसाठी प्रसिद्ध असलेले स्टॉल पाहायला मिळतात. परंतु, या वडापावचा शोध नक्की कुणी लावला? पहिल्यांदा वडापाव कधी बनवला गेला? याविषयी कधी विचार केलाय? नाही ना? मग आम्ही आज तुम्हाला तुमच्या आवडत्या या खाद्यपदार्थाचा जन्म कसा झाला याविषयी थोडक्यात सांगणार आहोत

तर ही गोष्ट आहे 1966 सालची. त्यावेळी मुंबई शहरामध्ये गिरणी कामगारांची संख्या प्रचंड होती. सर्वसामान्य गिरणी कामगारांना परवडेल अशा किमतीत कमी दरात एक खाद्यपदार्थ बनवण्याची संकल्पना एका मराठी व्यक्तीने मनात आणली आणि त्यातून वडापाव या खाद्य पदार्थाची निर्मिती झाली. 1966 साली पहिल्यांदा दादर रेल्वे स्थानकाबाहेर पहिला वडापावचा स्टॉल सुरू झाला आणि हा स्टॉल होता अशोक वैद्य यांचा.

वडापावची निर्मिती

बटाट्याच्या भाजीचे छोटे छोटे गोळे करून ते बेसनाच्या पीठात बुडवून तेलामध्ये तळल्यानंतर बटाटे वडा तयार झाला. मुंबईत अनेक ठिकाणी असलेल्या बेकरी मधून मिळणाऱ्या लादीपावामध्ये मध्यभागी हा वडा ठेवला आणि ग्राहकांना वडापाव असा पदार्थ पहिल्यांदा खायला मिळाला. लोकांनीही पावामधून हा पदार्थ खाणे पसंद केले. त्यावेळी शिवसेना मुंबई शहरामध्ये आपला विस्तार वाढवत होती. बाळासाहेबांनी ‘उठाव लुंगी, बजाव पुंगी’ ची घोषणा दिली होती. दक्षिण भारतीय लोकांची संख्या मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात वाढू लागली होती. सर्वसामान्य लोकांना दक्षिण भारतीय पद्धतीचे इडली आणि डोसा हे पदार्थ खाण्यासाठी परवडत नव्हते.

त्यामुळे सर्वसामान्य लोकांनी वडापावला प्रचंड पसंती दिली. पुढे जाऊन दक्षिण भारतीय लोकांच्या इडली डोसा या पदार्थांवर वडापाव कधी वरचढ ठरेल असे वाटले नव्हते. मराठी माणसांनी निर्मिती केलेल्या वडापावची शिवसेनेकडून प्रसिद्धी केली जाऊ लागली. जेव्हा शिवसेना महापालिकेत सत्तेवर आली तेव्हा त्यांनी स्थानिक वडापावच्या गाड्यांना पाठबळ देण्यास सुरुवात केली. अशाप्रकारे वडापावच्या गाड्या आता मुंबईभर पसरल्या होत्या.

1970 ते 80 च्या दरम्यान मुंबईमध्ये जागेच्या किंमती प्रचंड वाढल्या होत्या. गिरणी बंद पडू लागल्या होत्या. मराठी तरुण बेरोजगार होता. अशावेळी मराठी तरुणांनी ठिकठिकाणी वडापावचे स्टॉल लावले होते. वडापाव प्रसिद्ध झाला होता त्यानंतर वडापाव मध्ये विविध प्रकारचे बदल केले गेले.

गिरणगावातला प्रसिद्ध वडापाव

कीर्ती महाविद्यालयाच्या बाहेर मिळणारा चुरा वडापाव, हिंदू कॉलनीतला बाबूचा वडापाव, दादरच्या छबिलदास गल्लीतला वडापाव यांसारखे मुंबई शहरात अनेक ठिकाणी त्या त्या ठिकाणचे प्रसिद्ध वडापाव पाहायला मिळतात. प्रत्येक ठिकाणची चव वेगळी असते. आजकालच्या तरुणांनी  चीज वडापाव, बटर वडापाव यांसारखे प्रकार ही नव्याने सुरू केले आहेत. गजानन वडापाव वाल्यांचा चटणीबरोबर चा वडापाव प्रसिद्ध आहे. कुंजविहारचा मोठ्या पावामधला वडा प्रसिद्ध आहे. 

वडा पाव चे श्रेय नक्की कोणाला द्यायचे हा वाद आहे

अनेकांच्या मते या वडापावचे श्रेय अशोक वैद्य आणि त्यांच्या पत्नी मंगला वैद्य यांना जाते. तर काहींच्या मते पहिल्यांदा वडापाव निर्मितीचे श्रेय सुधाकर म्हात्रे यांना द्यावे. कारण, त्यांनीही त्याच काळात वडापावचा स्टॉल सुरू केला होता. पण वडापाव ची निर्मिती करण्यामध्ये अशोक वैद्य यांचे योगदान असल्याचे म्हटले जाते.

वडा पाव चे श्रेय बाजीराव पेशव्यांना जाते का?

वडापावचे श्रेय कुणाला द्यायचे हा वाद असताना काही लोकांना असे वाटते की या वडापाव निर्मितीचे श्रेय बाजीराव पेशव्यांना या दिले पाहिजे. कारण,  पेशवाईच्या काळात पेशव्यांचे कूक असलेल्या एका व्यक्तीने बाजीराव पेशवे यांच्यासाठी वडापाव बनवला होता असे म्हटले जाते .परंतु इतिहासात याचे कोणतेही पुरावे नाहीत. त्यामुळे तुम्ही रोज वडापाव खाता त्याच्या निर्मितीचे श्रेय कुणाला द्यावे याबद्दल निश्चित सांगता येत नाही.