जगातल्या सर्वात मौल्यवान हिऱ्याचा इतिहास आज आपण जाणून घेणार आहोत. हिरा आणि मौल्यवान म्हटलं तर सर्वात आधी मनात विचार येतो तो कोहिनूरचा. कारण जगतल्या सर्वांत श्रीमंतांपैकी कोणीही खरेदी करु शकणार नाही इतका मौल्यवान हिरा म्हणजे कोहिनूर असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सध्या लंडनच्या संग्रहालयात असलेला कोहिनूर भारताकडे सुपूर्द करा अशी मागणी अनेकदा करण्यात आली आहे. ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्वात आधी भारताने हा हिरा इंग्लंडकडे परत मागितला होता.
1976 मध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान जुलफकारअली भुट्टो यांनी ब्रिटीश पंतप्रधान जेम्स कॅलिगन यांना पत्राद्वारे सांगितले होते की कोहिनूर पाकिस्तानला देण्यात यावा. नोव्हेबर 2000 मध्ये तालिबान ने हा हिरा आपल्याला मिळावा अशी मागणी केली होती. कारण, कायद्याने तो हिरा अफगाणिस्तानची संपत्ती असल्याचा दावा त्यांनी केला होता. 2002 ला जेव्हा क्विन मदरचे निधन झाले त्यावेळी तिच्या शवपेटीवर कोहिनूर जडीत मुकूट ठेवण्यात आला होता. त्यावेळी ब्रिटनमधील सिख लोकांनी यावर आक्षेप घेतला होता. त्यांच्या मते तो हिरा त्यांच्या देशातून चोरलेला आहे.
दक्षिण भारतातील मंदिरातून कोहिनूर चोरल्याची संभाव्यता-
कोहिनूरच्या बाबतीत असे म्हटले जाते, संभाव्यता आहे की तुर्कानी दक्षिण भारतातील कोणत्या तरी मंदिरातील मुर्तीच्या डोळ्यातून हा हिरा काढला होता. कोहिनूर पुस्तकाचे लेखक विलियम डेलरेम्पल म्हणतात,कोहिनूरचा पहिला मालक असल्याचा संदर्भ 1750 मध्ये फारसी इतिहासकार मोहम्मद मारवी यांनी नादिरशहाच्या भारत आक्रमबाबत केलेल्या वर्णनात वाचायला मिळतो. मारवी लिहतात की मी माझ्या डोळ्यांनी कोहिनूर पाहिला होता. तेव्हा कोहिनूर नादिरशहाच्या तख्त ए ताऊस (जगातल सर्वात महागड सिंहासन)वरच्या भागात लावण्यात आला होता. जो नादिरशहाने दिल्लीतून लुटून हैरावतला आणला होता. तेव्हा कोहिनूरचा आकार कोंबडीच्या अंड्या एवढा होता. त्या हिऱ्याला विकल्यानंतर येणाऱ्या पैशातून जगातल्या सर्व लोकांना कमीत कमी अडीच दिवस अन्नपुरवठा करता येईल इतका तो महाग होता असे म्हटले जाते.
तख्त ए ताऊसला बनविण्यासाठी त्यावेळी ताजमहलच्या दुप्पट पैसे लागले होते. नंतर कोहिनूरला तख्त ए ताऊस मधून काढण्यात आले. कारण नादिरशहाला हा हिरा आपल्या दंडात बांधायचा होता. नादिरशहाने कर्नाल जवळ आपली दिड लाख सैन्यांच्या तुकडी घेवून मोहम्मद शहा रंगीलाच्या 10 लाख सैन्यांला हरवले होते. दिल्लीत पोहचताच नादिरशहाने अनेकांवर हल्ला करत धुमाकूळ घातला होता. अशा हल्ल्याची उदाहरणे इतिहासात कमी आहेत.
नादिरशहाची दिल्लीवर चाल-
प्रसिद्ध इतिहासरकार विल्यम फ्लोर यांनी एका लेखात लिहले आहे. जसे नादिरशहाचे 40 हजार सैनिक दिल्लीत घुसले तसे अन्न धान्याच्या किंमती गगनाला भिडल्या. नादिरशहाच्या सैन्याने जेव्हा भाव करायला सुरुवात केली तेव्हा व्यापारी आणि सैनिकांमध्ये झटापट झाली. दुपारपर्यंत 900 फारसी सैनिक मारले गेले होते. या नंतर नादिर शहाने दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता लोकांना मारण्याचा आदेश सैन्याला दिला. यामध्ये लाल किल्ला, जामा मशिद, दरीबा आणि चांदणी चौकात जवळपास 30 हजार नागरीक मारले गेले.
मोहम्मद शहाचे सेनापती निजामुल मुल्क विना पगडीचे नादिरशहा समोर गेले आणि गुडघ्यावर बसून म्हणाले दिल्लीतल्या लोकांचा जीव घेण्यापेक्षा माझ्याकडून बदला घ्या. नादिरशहाने दिल्ली सोडण्यापूर्वी 100 करोड द्या अशी मागणी केली सेनापती निजामुल यांच्याकडे केली. तसेच ही मागणी मान्य केली तरच सुरु असलेला रक्तपात थांबिवला जाईल असे जाहीर केले. पुढच्या काही दिवसात निजामुल यांनी आपल्याच राजधानीला लुटले आणि हे पैसे दिले. थोडक्यात काय एका क्षणात 348 वर्षांपासून मुगलांनी जमा केलेल्या संपत्तीचा मालक दुसराच कुणीतरी झाला होता.
मोहम्मद शहाच्या पगडीतून नादिरशहाकडे गेला कोहिनूर-
विल्यम डॉलरेम्पल आणि अनिता आनंद यांनी कोहिनूरचा इतिहास लिहायला प्रचंड मेहनत घेतली. मी मुघल रत्नांच्या जाणाकारांशी संवाद साधून आपल्या शोधाला सुरुवात केली. त्यामुळे पहिल्यांदा हे लक्षात आले की कोहिनूर बाबत ज्या गोष्टी सांगितल्या जातात त्यापैकी बऱ्याच गोष्टींना काही ऐतिहासिक आधार नाही. नादिरशहाकडे गेल्यानंतर पहिल्यांदा कोहिनूर ने लोकांचे लक्ष वेधले असे अनिता आनंद सांगतात. लेखक सांगतात की दरबारातल्या एक नाचणाऱ्या बाईने नादिरशहाला सांगितले की मोहम्मद शहाने आपल्या पगडीमध्ये कोहिनूर लपविलेला आहे. त्यामुळे नादिरशहाने मोहम्मद शहाला म्हटले की आपल्या दोस्ती खातर आपण एकमेकांची पगडी बदलुया आणि अशा प्रकारे कोहिनूर नादिरशहाकडे आला. जेव्हा त्याने पहिल्यांदा कोहिनूर पाहिला तेव्हा तो कोहिनूरला पहातच राहिला.
मुघलांची संपत्ती अफगाणिस्तानला नेताना नादिरशहाला 17000 घोडे, 700 हत्ती, 4000 उंट लागले होते-
दिल्लीतली लूट अफगाणिस्तानला घेवून जाण्याचा एतिहास फारसी इतिहासकार मोहम्मद काझी मारवीने आपले पुस्तक आलम आरा ए नादरी मध्ये लिहले आहे. ते सांगतात दिल्लीत 57 दिवस राहिल्यानंतर 16 मे 1739 ला नादिरशहा आपल्या देशात परतायला निघाला. त्यावेळी तो आपल्या सोबत मुघलांची प्रचंड संपत्ती घेऊन आला. त्याची सर्वात मोठी लूट होती तख्त ए ताऊस ज्यामध्ये कोहिनूर आणि तैमूर ची प्रतिकृती बनविण्यात आली होती. लुटलेला सर्व ऐवज 700 हत्ती, 4000 उंट आणि 17000 घोड्यांवरुन ईराणला रवाना केला गेला. जेव्हा सैनिक चेनाब च्या पुलावरून पुढे गेले तेव्हा त्यांची संपूर्ण तपासणी करण्यात आली. काही सैनिकांनी हिरे मोती रत्ने जप्त केली जातील या भितीने जमीनीत पुरली तर काहींनी पुन्हा नदितून शोधता येतील या हेतून नदीत फेकली.
नादिरशहाकडेही कोहिनूर फारकाळ राहिला नाही-
नादिरशहाच्या हत्येनंतर तो हिरा त्याचा अंगरक्षक अहमद शाह अब्दालीकडे गेला. बऱ्याच लोकांच्या हातातून 1813 ला तो महाराजा रणजितसिंह यांच्याकडे आला. 1829 ला महाराजा रणजितसिंहचे निधन झाले. प्रचंड सत्ता संघर्षानंतर 1833 ला 5 वर्षीय दिलीपसिंहला पंजाबचा राजा म्हणून घोषित केले गेले. परंतु दुसऱ्या एंग्लो सिख युद्धानंतर त्यांचे साम्राज्य आणि कोहिनूरवर इंग्रजांचे अधिपत्य आले. दिलीपसिंहला त्यांच्या आईपासून वेगळे करुन एका ब्रिटिश जोडप्यासोबत फतेगड किल्ल्यावर राहण्यासाठी पाठविण्यात आले. त्यानंतर लॉर्ड डलहौजीने हा हिरा जहाजातून राणी व्हिक्टोरीयाकडे पाठविण्याचा निर्णय घेतला. त्या जहाजाला वाटेत अनेक समस्यांचा सामना करावा लागला.
कोहिनूर पुस्तकाच्या सह लेखिका अनिता आनंद यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, ज्या जहाजातून कोहिनूर इंग्लंडला पाठविण्यात आला त्यावेळी जहाजावर कॉलराची साथ पसरली होती. अनेकांना जहाजात असूनही सोबत कोहिनूर असल्याचे माहिती नव्हते. अनेक समस्यांचा सामना करत जहाज इंग्लंडला पोहचले. जेव्हा कोहिनूर इंग्लंडला पोहचल्यानंतर त्याला लंडनच्या क्रिस्टल पॅलेसमध्ये ठेवण्यात आले होते. कोहिनूरला घेऊन गेल्यानंतर 3 वर्षांनी इंग्लंडमध्ये या हिऱ्याबद्दल लोकांना सांगण्यात आले होते. एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार लोकांनी कोहिनूर पाहण्यासाठी संग्रहालयाबाहेर प्रचंड गर्दी केली होती. इतकी गर्दी की लंडनमध्ये यापूर्वी कधीही इतके लोक एखादी वस्तू पाहण्यासाठी जमले नव्हते. इतकेच नव्हे तर प्रदर्शनात ठेवण्यात आलेला हिरा पाहण्यासाठी नागरीकांना अनेक तास रांगेत उभे रहावे लागले होते. महाराणी व्हिक्टोरीयानंतर कोणत्याही व्यक्तीने कोहिनूर आपल्या मुकुटात परीधान केला नाही. याला अपवाद केवळ व्हिक्टोरीया राणीची सून महारानी एलेक्झेंड्रा ठरली.