महाराणा प्रताप यांनी अकबराविरुध्द लढा दिला आणि सैन्य कमी असतानाही ते झुकले नाहीत. जितके त्यांचे किस्से प्रिसिद्ध आहेत तितकेच त्यांच्या चेतक घोड्याचेही किस्से प्रसिद्ध आहेत. त्या घोड्याच्या काही दंतकथाही सांगितल्या जातात. असे म्हटले जाते की महाराणा प्रतापा दोन्ही हातात भाले घेऊन विरोधी सैनिकांवर हल्ला करत असतं. त्यांच्या हातात इतकी ताकद होती की ते भाल्याच्या टोकाने दोन सैनिकांवर एकत्र वार करु शकत. असेही म्हटले जाते की मेवाडमधील नागरीक सकाळी उठल्यानंतर देव देवतांना नाही तर महाराणा प्रतापांना नमस्कार करतात. तर आज आपण जाणून घेणार आहोत महाराणा प्रताप यांच्या विषयी काही महत्वाचे किस्से-
निष्ठावान मुस्लिम व्यक्तीने वाचविला महाराणांचा जीव-
1576 मध्ये महाराणा प्रताप आणि अकबराच्या सैन्यात युद्ध झाले. मानसिंह अकबरच्या सैन्याचे नेतृत्व करीत होता. असे म्हटले जाते की मानसिंहबरोबर 10 हजार घोडेस्वार आणि हजारो पायदळ सैनिक होते. पण महाराणा प्रताप 3 हजार घोडेस्वार व काही मूठभर सैनिकांना सोबत घेऊन लढत होते. या दरम्यान, महाराणा प्रतापांवर मानसिंहाच्या सैन्याने हल्ला केला. त्यावेळी महाराणांचा एक निष्ठावंत हकीम खान सूर यांने तो वार आपल्या अंगावर झेलला आणि त्यांचा जीव वाचविला. भामाशहा आणि झालामन सारखे त्यांचे अनेक बहादूर साथीदारही या युद्धामध्ये महाराणांचे प्राण वाचवताना शहीद झाले.
घोडा चेतक –
चेतक हा महाराणांचा सर्वात आवडता घोडा होता. हल्दीघाटीमध्ये महाराणा खूप जखमी झाले होते. त्यांना मदत करण्यासाठी कोणीही सैन्य नव्हते. अशा परिस्थितीत महाराणांनी चेतकची लगाम पकडली आणि ते निघाले त्यावेळी त्यांच्या मागे दोन मुघल सैनिक लागले होते. परंतु चेतकच्या वेगासमोर ते दोघे हरले. वाटेत डोंगरच्या कपारीतून एक नाला वाहत होता. चेतक देखील जखमी झाला होता परंतु त्याने नाल्यावरून उडी मारली आणि मुघल सैनिक त्याच्याकडे पाहतच राहीले. पण आता चेतक दमला होता. तो धावण्यास अक्षम होता. महाराणा यांचे प्राण वाचवून चेतक स्वत: शहीद झाला.
सर्व जनता राणांचे सैन्य होती-
राणा प्रताप यांचा जन्म कुंभलगड किल्ल्यात झाला होता. हा किल्ला जगातील सर्वात जुन्या टेकड्यांपैकी असलेल्या अरवली टेकडीवर आहे. राणांचे पालन पोषण भिल्ल्यांच्या कुका जातीतील काही लोकांनी केले. भिल्ल राणांवर खूप प्रेम करत असतं. तेच राणाचे डोळे व कान होते. अकबरच्या सैन्याने कुंभलगडला वेढा घातला तेव्हा भिल्लांनी जोरदार युद्ध केले आणि तीन महिने अकबराच्या सैन्याला रोखून धरले. एका दुर्घटनेमुळे किल्ल्यातील पाण्याचा स्रोत घाण झाला. त्यानंतर महाराणांना काही दिवसांनी हा किल्ला सोडावा लागला आणि तिथे अकबराच्या सैन्याने ताबा मिळवला. पण अकबराचे सैन्य फार काळ त्या ठिकाणी थांबू शकले नाही आणि पुन्हा कुंभलगड महाराणांच्या अधिपत्याखाली आला. यावेळी, महाराणांनी अकबराकडून शेजारील आणखी दोन राज्ये हस्तगत केली.
गवताची भाकरी-
जेव्हा महाराणा प्रताप अकबराकडून पराभूत होऊन जंगलात भटकत होते, तेव्हा एक दिवस अन्न पाच वेळा शिजवले गेले आणि प्रत्येक वेळी ते अन्न सोडून त्यांना पळावे लागले. एकदा प्रतापांची पत्नी आणि त्यांची सून यांनी गवताचे बियाणे बारीक करून भाकरी बनवली. त्यापैकी आर्धी भाकरी मुलांना दिली व उर्वरित अर्धी दुसर्या दिवसासाठी ठेवली. त्याचवेळी प्रतापांना आपल्या मुलीची आरोळी ऐकू आली. एका जंगली मांजरीने त्यांच्या मुलीच्या हातातून भाकरी हिसकावून पळ काढला होता.त्यामुळे भुकेने व्याकूळ झालेल्या मुलीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हे पाहून राणांचे हृदय पिळवटून निघाले. यानंतर, आपल्या अडचणींवर मात करण्यासाठी त्यांनी एका पत्राद्वारे अकबरला भेटण्याची इच्छा व्यक्त केली.
अकबरानेसुद्धा केली स्तुती-
अकबरापासून पराभूत होऊन जेव्हा महाराणा प्रताप जंगलात भटकत होते, तेव्हा अकबराने गुप्तहेर पाठवून महाराणांची चौकशी केली. त्यावेळी गुप्तहेर आला व त्याने सांगितले की महाराणा आपल्या कुटुंबासह आणि सेवकांसह जेवत होते आणि जेवणात वन्य फळे, पाने व मुळे होती. तसेच तिथे कोणीही दु:खी किंवा उदास नव्हते असेही गुप्तचराने अकबराला सांगितले. हे ऐकून अकबराचे हृदय हेलावले आणि त्याच्या मनात महाराणांबद्दल आदर निर्माण झाला. अकबरचा विश्वासू सरदार अब्दुर्रहीम खानखानानेही अकबरच्या तोंडातून प्रतापांची स्तुती ऐकली होती. त्याने स्वतःच्या भाषेत लिहिले, “या जगातील सर्व नाशवंत आहे. महाराणाने पैसे आणि जमीन सोडून दिली, परंतु त्याने कधीही मान झुकवली नाही. भारतातल्या राजांपैकी तो एकमेव आहे ज्याने आपल्या जातीचा अभिमान राखला आहे.”
भाऊ शक्ती सिंह होता विरोधात-
हल्दीघाटीनंतर जेव्हा महाराणा मुघल सैन्याच्या तावडीतून सुटून काही अंतरावर पोहोचले तेव्हा कोणीतरी मागून बोलले – “ये, नीळ्या घोड्यावरच्या स्वार.” जेव्हा महाराणांनी मागे वळून पाहिले तेव्हा त्यांचा भाऊ शक्तीसिंग येत होता. महाराणांसोबत शक्तीचे पटत नव्हते. म्हणून बदला घेण्यासाठी तो अकबरच्या सैन्यात सहभागी झाला होता आणि तो युद्धाच्या मैदानात मुघलांच्या बाजूने लढत होता.युद्धाच्या वेळी शक्ती सिंहने पाहिले की, महाराणांचा दोन मुघल सैनिक पाठलाग करत आहेत. त्यावेळी शक्तीचे बंधू प्रेम जागे झाले आणि त्याने त्या सैनिकांना ठार केले.
महाराणा प्रताप यांना 11 बायका होत्या-
महाराणा प्रताप यांना एकूण 11 बायका होत्या. महाराणांच्या मृत्यूनंतर, महाराणी अजाब्दे या ज्येष्ठ राणीचा मुलगा अमरसिंह पहिला राजा झाला.