तुमच्यापैकी अनेकांना माहिती असेल 1971 साली भारताने पाकिस्तानशी युद्ध करून बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून दिले. परंतु तुम्हाला हे माहिती आहे का बांगलादेश पाकिस्तानशी कसा जोडला गेला होता. बांगलादेश पाकिस्तानशी जोडण्याचा संबंध कसा आला. तर आज आपण जाणून घेणार आहोत बांगलादेशची निर्मिती नक्की कशी झाली.
लॉर्ड कर्झनमुळे बंगालचे विभाजन
तर या ऐतिहासिक गोष्टीची सुरुवात झाली 1905 पासून. जेव्हा लॉर्ड कर्झनने बंगाल राज्याचे विभाजन क्षेत्रफळाचे कारण देत केले होते. क्षेत्रफळाच्या दृष्टीने हे राज्य अतिशय मोठे असल्याचे कर्झनने म्हटले होते.
राज्य मोठे असल्यामुळे प्रशासन चालवणे देखील कठीण असल्याचे त्याने म्हटले होते. त्यावेळी बंगालमध्ये बिहार, ओरिसा, पश्चिम बंगाल, आसाम आणि आजच्या बांगलादेशचा समावेश होता. अशाप्रकारे पूर्व बंगाल आणि पश्चिम बंगाल असे बंगालचे दोन भाग करण्यात आले.
पश्चिम बंगालमध्ये बिहार, उडीसा आणि पश्चिम बंगालसारख्या राज्यांचा समावेश करण्यात आला. तर पूर्व बंगालमध्ये आसाम आणि आजच्या बांगलादेशाचा समावेश करण्यात आला. परंतु लॉर्ड कर्झनने बंगालच्या विभाजनासाठी जे कारण सांगितले होते ते मात्र सत्य नव्हते. खरेतर असे करून ब्रिटिश सरकार हिंदू आणि मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करू इच्छित होते. या घटनेच्या विरोधात बंगाली नागरिकांनी 13 ऑक्टोबर या दिवशी बंगालचे विभाजन झाले त्या दिवसाला काळा दिवस म्हणून साजरा करायला सुरुवात केली.
मुस्लिम लीगची स्थापना
विभाजनाचा परिणाम असा झाला की 1906 ला मुस्लिम लीगची स्थापना झाली. म्हणजेच ब्रिटिश आपल्या धोरणात सफल ठरले होते. म्हणजेच ब्रिटिश लोक हिंदू-मुस्लिम तेढ वाढवण्यात यशस्वी झाले होते. विभाजनाच्या निषेधार्थ लोक विदेशी वस्तूंची होळी करू लागले आणि स्वदेशी वस्तूंचा स्वीकार करू लागले. खरे तर बंगाल हे एक असे राज्य होते जे भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी प्रयत्नशील होते. ज्याला घाबरून हे आंदोलन थांबवण्यासाठी इंग्रजांनी बंगालचे विभाजन करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 1911 साली बंगाली नागरिकांच्या प्रचंड विरोधानंतर बंगालला पुन्हा एकत्र करण्यात आले. त्याच वर्षी देशाची राजधानी कोलकत्ता सोडून दिल्ली करण्यात आली. परंतु एकदा विभाजन करून ब्रिटिशांनी मुस्लिम लोकांना भारतापासून वेगळे करायला सुरुवात केली होती.
बंगाली जनतेवर पाकिस्तानमध्ये अत्याचार
1947 ला पूर्व बंगाल जिथे मुस्लिमांची संख्या जास्त होती. धर्माच्या आधारावर पूर्व बंगाल ला भारतापासून वेगळे करून पाकिस्तानशी जोडले गेले. पाकिस्तानने जमिनीसाठी पूर्व बंगालला आपला एक भाग करून घेतले. परंतु, बंगाली नागरिक आणि बंगाली भाषा यांना कधीच आपले मानले नाही. बंगाली मुस्लिम असोत किंवा बंगाली हिंदू असो यांचा पाकिस्तानमध्ये नेहमी अपमान होत असे. अनेकदा त्यांच्या रंगावरून त्यांचा अपमान केला जात असे. वारंवार होणाऱ्या या अपमानामुळे तिथल्या बंगाली लोकांनी पाकिस्तान पासून स्वायत्ततेची मागणी केली. याच मोहिमेतून ईस्ट पाकिस्तान मध्ये एका राजकीय पक्षाची निर्मिती झाली. त्याचे नाव आवामी लीग असे ठेवण्यात आले. या पक्षाचे नेते होते शेख मूजीबुल रेहमान. ज्यांची मुलगी शेख हसीना आज बांगलादेशचे नेतृत्व करत आहे.
1970 मध्ये पाकिस्तान मधील निवडणुकीमध्ये पाकिस्तानमध्ये नवीन पक्ष आवामी लीगने निवडणूक जिंकली. पण पाकिस्तानचे जनरल आयुब खान यांनी शेख मूजीबुल रेहमान यांना पंतप्रधान होऊ दिले नाही. कारण, एका बंगाली व्यक्तीला ते संपूर्ण पाकिस्तानचा पंतप्रधान करायला इच्छुक नव्हते. याचाच अर्थ ते बंगाली लोकांसोबत भेदभाव करत असत. त्यांचा अपमान करत असत. इतकेच नाही तर शेख मूजीबुल रेहमान यांना पाकिस्तानच्या जनरलने तुरुंगात पाठवले. या घटनेच्या निषेधार्थ पाकिस्तानमध्ये आंदोलन सुरू झाले. या लोकांना भीती दाखविण्याचे काम पाकिस्तान लष्कराने सुरू केले. त्याचबरोबर ते बंगाली महिलांवर बलात्कार करू लागले. या अत्याचारावर तोडगा काढण्यासाठी बंगाली नागरिकांनी मुक्ती वाहिनी नावाची संघटना सुरू केली.
बंगाली जनता भारताच्या आश्रयाला
पाकिस्तानच्या आत्याचाराला कंटाळून बंगाली लोक भारताकडे आश्रय मागू लागले. त्यामुळे भारतीय व्यवस्थेवर ताण पडू लागला कारण जवळपास 1 करोड बंगाली नागरिक भारताच्या आश्रयाला आले होते. मात्र, एवढ्या मोठ्या लोकसंख्येला सांभाळताना भारतीय व्यवस्था कोलमडू लागली होती. यावर तोडगा म्हणून पूर्व बंगाली लोकांची बाजू घेत भारताने 1971 मध्ये बांगलादेशला पाकिस्तानकडून स्वातंत्र्य मिळवून दिले. तसे पाहिले तर बांगला देशाला भारतापासून विभक्त करण्याचे षडयंत्र ब्रिटिशांनी रचले होते. सत्तेसाठी त्यांनी साम, दाम, दंड, भेद या सूत्राचा या ठिकाणी वापर केला होता आणि इंग्रजांची रणनीती खरी देखील ठरली.