दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. रूग्णालयात बेड उपलब्ध नसल्यामुळे बऱ्याच रुग्णांनी स्वतःला होम आयसोलेशनमध्ये ठेवले आहे. अशा परिस्थितीत, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी मोठे आव्हान असते. स्वत: ला सुरक्षित ठेवताना रुग्णाची काळजी कशी घ्यावी? कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे ? कोणत्या गोष्टींकडे दुर्लक्ष करूच नये? हे आज आम्ही या लेखाच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहोत.
मास्क वापरणे गरजेचे-
घराच्या ज्या खोलीत कोविड पेशंटला ठेवले आहे, त्या ठिकाणी जर तुम्ही जात आहात तर तुम्ही ट्रिपल लेअर मास्क लावून जावे. त्याच बरोबर त्या खोलीमध्ये कमीत कमी जाण्याचा प्रयत्न करावा. परंतु, तरीही तुम्हाला त्या खोलीत जावेच लागणार असेल तर तुम्ही तेथे ट्रिपल लेअर मास्क घालून जावे. त्याच बरोबर रुग्णालाही मास्क घालायला सांगावे. तुम्ही तोंडाला लावलेल्या मास्कला वारंवार स्पर्श करु नका. फक्त कानात लावलेल्या इलॅस्टिकचा वापर करुन मास्क लावा व काढा आणि त्यानंतर आपला हात स्वच्छ धुवा. जर तुमचा मास्क घाण किंवा ओला झाला असेल तर तो त्वरित बदला. त्याऐवजी नवीन आणि स्वच्छ मास्क वापरा. त्याच बरोबर जुन्या मास्कची विल्हेवाट लावल्यानंतर देखील हात व्यवस्थित स्वच्छ करणे गरजेचे आहे.
हात स्वच्छ ठेवा-
जर तुमच्या घरात कोविड रुग्ण असेल तर त्याच्या खोलीत जाण्यापूर्वी आणि बाहेर आल्यानंतर ताबडतोब आपले हात स्वच्छ करा. या शिवाय जेवण बनविण्यापूर्वी, खाण्यापूर्वी, शौचालयातून आल्यानंतर किंवा जेव्हा तुम्हाला तुमचे हात घाण वाटत आहेत तेव्हा ताबडतोब आपले हात स्वच्छ करा. हात धुण्यासाठी साबण आणि पाणी वापरा. कमीतकमी 40 सेकंद हात चांगले धुवा. हात स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझरचा वापर करा. हात स्वच्छ केल्यावर ते सुकविण्यासाठी टिश्यू पेपर वापरा. जर नसेल तर स्वच्छ कपड्याचा वापर करा. जेव्हा हा कपडा ओला आहे असे वाटेल तेव्हा तो धुवायला टाका किंवा त्या ठिकाणी दुसरा कपडा वापरा.
रुग्णाशी थेट संपर्क-
कोविड रूग्णाच्या थेट संपर्कात जाऊ नये. जर आपण रुग्णाला शारीरिकरित्या हाताळत असाल तर स्पर्श करण्यापूर्वी डिस्पोजेबल ग्लोव्हज वापरा. खोली सोडताच त्याची विल्हेवाट लावा. वापरलेले ग्लोव्हज काढून टाकल्यानंतरही आपले हात स्वच्छ धुवा.
वापरातल्या वस्तू वेगळ्या ठेवा-
रूग्णाला त्याचे जेवण त्याच्या खोलीत द्या. रुग्णासाठी वापरण्यात येणारी जेवणाची भांडी, पाण्याच्या बाटल्या, साबण, टॉवेल्स यांचा वापर इतर व्यक्तींनी करु नये. रुग्णांसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू वेगळ्या ठेवा. रुग्णाच्या जेवणाची भांडी स्वच्छ करताना ती साबण किंवा पावडरीनेच स्वच्छ करा. ही भांडी स्वच्छ करताना प्लास्टिक हातमोजे वापरा. ते काढल्यानंतर पुन्हा आपले हात स्वच्छ करा. हे आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे.
स्वच्छतेकडे दुर्लक्ष करू नका
घर स्वच्छ करणे देखील महत्वाचे आहे. नियमितपणे स्विच बोर्ड, रेलिंग आणि दाराचे हँडल साफ करा. आपला फोन देखील सॅनिटाइज करा. आपण हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की रुग्णाने डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर घेणे आवश्यक आहे. त्याच्या आरोग्यासंदर्भातली माहिती डॉक्टरांना वारंवार देत रहा.
आपली नियमित तपासणी करा-
आपण कोरोना रूग्णाची काळजी घेत असल्यास आपल्या आरोग्याची काळजी देखील घेतली पाहिजे. जरी आपण रुग्णाच्या फार जवळ जात नसाल तरीही आपल्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. आपले टेम्प्रेचर तपासत रहा. कोविड -19 शी संबंधित कोणतीही लक्षणे आपल्यामध्ये जाणवत असतील जसे ताप, कफ, श्वास घ्यायला त्रास होणे किंवा वास न येणे आणि तोंडाची चव जाणे यांसारखी लक्षणे दिसल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
आपल्या आरोग्याची काळजी घेणे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे. म्हणून आपल्या आहारात पौष्टीक पदार्थांचा समावेश करा. व्यायाम देखील सुरू ठेवा. जर आपल्याला कोविडचा नाश करायचा असेल तर आपण स्वत: ला आतून बळकट ठेवले पाहिजे. काळजी घ्या, सुरक्षित रहा आणि विनाकारण घराबाहेर पडू नका.