पिंजरा.. मराठी सिनेविश्वातलं सुवर्णपान. 31 मार्च 1972 हाच तो दिवस ज्या दिवशी पिंजरा प्रदर्शित झाला आणि रुपेरी पडद्याला चारचाँद लागले. या चित्रपटातील सर्व गाणी आणि संवादांच गारुड रसिक प्रेक्षकांच्या मनावर अद्याप आहे. डॉक्टर श्रीराम लागू, निळू फुले, संध्या, वत्सला देशमुख यांसारख्या कलाकारांचा दर्जेदार अभिनय पडद्यावर अगदी जिवंत वाटतो. चित्रपटाची सामाजिक पार्श्वभूमी लक्षात घेता चित्रपती व्ही. शांताराम यांच्या दूरदृष्टीची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. मराठीत पिंजरा चित्रपटाच स्थान त्याचा आशय, विषय, मर्म , बॉक्सऑफीसवरील गणित अशा कारणांसाठी तो महत्वपूर्ण ठरला. आज आपण जाणून घेऊयात पिंजरा चित्रपटाविषयी माहिती नसलेल्या काही रंजक गोष्टी…
जर्मन सिनेमाच डबिंग आहे पिंजरा चित्रपट-
पिंजरा चित्रपटाचे कथानक 1930 साली प्रदर्शित झालेल्या द ब्लू एंजल या जर्मन चित्रपटावर आधारीत आहे. द ब्लू एंजलच्या याच कथानकाला महाराष्ट्रातील एका गावातल्या मास्तरची तमासगीरीमुळे झालेली वाताहत असं सुत्र ठेवून आणि कथा गुंफून ती लोकप्रिय करण्याची हातोटी शांताराम बापूंनी केली. द ब्लू एंजल चित्रपटाचे दिग्दर्शन Josef von Sternberg यांनी केले होते.
पिंजरा मराठी चित्रपटसृष्टीतला पहिला रंगीत सिनेमा-
मराठी सिनेसृष्टीत पिंजरा हा पहिलाच चित्रपट आहे जो तांत्रिकदृष्ट्या रंगीत म्हणून नावाजला गेला. अर्थात हा प्रयोग यशस्वी करण्याचे श्रेय व्ही. शांताराम यांना जाते.
मास्तरांची भुमिका कोण करणार याबद्दल व्ही.शांताराम होते द्विधा मनस्थितीत-
सदर चित्रपटात श्रीराम लागू यांनी साकारलेली शाळेतील मास्तरांची व्यक्तिरेखा आजही रसिक प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. या चित्रपटातील मास्तरांची भुमिका कोण साकारणार यासाठी व्ही. शांताराम द्विधा मनस्थितीत होते. त्यावेळी या चित्रपटात आक्काची भुमिका साकारणाऱ्या वत्सला देशमुख यांनी व्ही. शांताराम यांच्याकडे श्रीराम लागू यांच्या नावाची शिफारस केली. डॉक्टर लागू यांचा नटसम्राट पहायल्यानंतर वत्सला देशमुख यांना लागू या भुमिकेसाठी योग्य वाटले होते.
चित्रपटाच्या नावाला श्रीराम लागू यांचा होता विरोध-
श्रीराम लागू यांचा चित्रपटाच्या नावाला सुरुवातीपासूनच विरोध होता. मात्र, चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली त्यावेळी श्रीराम लागू यांना लक्षात आले की हा पिंजरा लोखंडाचा नसून माणसांच्या जाणीवांचा आहे. तसेच या चित्रपटात माणूस अगदी उत्तम प्रकारे सापडू शकतो. त्यामुळे ते या चित्रपटाच्या प्रेमात पडले.
व्ही. शांताराम यांना चित्रपटातील गाण्यांवर हा चित्रपट तारुण न्यायचा होता-
व्ही. शांताराम यांना चित्रपटातील गाणी आणि कथेवर हा चित्रपट तारुण न्यायचा होता हे आपल्या लक्षात येते. गाण्यांची लांबी आणि संख्या पाहता त्यांनी संगीतकार राम कदम यांना प्रत्येक गाण्याच्या अनेक चाली बनवायला सांगितल्या होत्या. त्यामुळे राम कदम यांनी 9 गाण्यांसाठी जवळपास 100 चाली तयार केल्या होत्या.
21 वर्षांच्या माया जाधव भोवळ येऊन पडल्या-
पिंजरा मधल्या मला लागली कुणाची उचकी या गाण्याच्या चित्रिकरणादरम्यान त्यावेळी 21 वर्षांच्या असणाऱ्या माया जाधव ब्लड प्रेशरमुळे भोवळ येऊन खाली पडल्या. त्यामुळे चित्रीकरण थांबवले होते. काहींनी दुसरी सहनृत्यांगणा घेऊन काम करण्याचा सल्ला व्ही. शांताराम यांना दिला. पण त्यांनी कुणाचेच काही ऐकले नाही. माया जाधव यांची प्रकृती ठीक झाल्यानंतर 2-3 दिवसांनी हे गाणे चित्रीत करण्यात आले.
गाणी लिहून खेबूडकरही झाले होते निराश-
पिंजरासाठी जगदीश खेबूडकरांनी तब्बल 110 गाणी लिहली होती. त्यापैकी 9 गाणी निवडण्यात आली होती. या चित्रपटातील तुम्हावर केली मी मर्जी बहाल, नका सोडून जावू रंग महाल. या लावणीसाठी खेबूडकरांकडून शांताराम बापूंनी 49 लावण्या लिहून घेतल्या होत्या. त्यापैकी एकही न आवडल्याने ते निराश झाले होते. त्यांची रात्रीची झोपही पार उडाली होती. डोक्यात लावणीचाच विचार घोळत होता आणि रात्री दोनच्या दरम्यान त्यांना लावणी सुचली. लगेचच त्यांनी फोन करुन ही लावणी शांताराम बापूंना ऐकवली. तुम्हावर केली मी मर्जी बहाल…व्वा, झक्कास. खेबूडकरजी गाण अगदी जमल बरं का अशा शब्दात कौतुक करत बापूंनी त्यांना शाब्बासकी दिली होती.
बॉलिवुडने घेतली मराठी चित्रपटाची धास्ती-
विषेश म्हणजे पिंजरा हा केवळ मराठीमध्येच नव्हे तर हिंदीमध्येही त्याच सुमारास प्रदर्शित झाला होता. पिंजराची धास्ती त्यावेळी बॉलिवुडनेही घेतली होती. इतकी की अनेक सिनेमांच्या तारखा त्यावेळी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. 1972 सालचा मराठीतला सर्वात जास्त कमाई करणार चित्रपट म्हणून पिंजराचे नाव आजही अभिमानाने घेतले जाते.
संध्या शांताराम यांनी कोरीओग्राफ केल्या होत्या लावण्या-
या चित्रपटातील लावण्यांचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या लावण्या दस्तुरखुद्द अभिनेत्री संध्या शांताराम यांनी कोरीओग्राफ केल्या होत्या. विशेष म्हणजे चित्रपटात एक-दोन ठिकाणी मादक प्रसंग व दृष्य असूनही चित्रपट कुठेही अश्लिल वाटत नाही. हे या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल .
पिंजरा चित्रपट HD मध्ये पुनःप्रदर्शित करण्यात आला-
18 मार्च 2016 या दिवशी म्हणजे जवळपास 44 वर्षांनी हा चित्रपट सिनेमागृहात पुन्हा प्रदर्शित करण्यात आला आणि तो ही डिजीटल फॉरमॅट मध्ये. म्हणजेच एचडी क्वालिटी मध्ये त्यावेळी चित्रपटातील काही गाण्यांना आणि महत्वाच्या प्रसंगांना नव्या ध्वनीचीही जोड देण्यात आली होती.