मराठी चित्रपटसृष्टीतला विनोदवीर लक्ष्मीकांत बेर्डे.म्हणजे तुमचा आमचा आवडता ‘लक्ष्या’.कमी काळात आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकणाऱ्या लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे यांची जोडी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत सर्वांनाच सुपरिचित आहे. चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवण्याआधी लक्ष्याने रंगभुमीवर आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर नाव कमावले होते. लक्ष्याला पहिल्यांदा पाहताच त्याच्या विनोदी शैलीमुळे आणि उत्कृष्ठ अभिनयामुळे निर्माते दिग्दर्शक महेश कोठारे प्रभावित झाले होते. त्यामुळे केवळ 1 रुपया मानधन देऊन महेश कोठारेंनी लक्ष्याला त्यांच्या धुमधडाका चित्रपटासाठी साइन करुन घेतले.
तर ही गोष्ट आहे आत्माराम भेंडींनी बबन प्रभुंच्या स्मृतीप्रित्यर्थ झोपी गेलेला जागा झाला या नाटकाची निर्मिती नव्याने करणार असल्याची घोषणा केली त्यावेळची. यामध्ये बबन प्रभुंची व्यक्तीरेखा लक्ष्मिकांत बेर्डे साकारणार होते. या नाटकात महेश कोठारेंच्या आईवडीलांचीही भुमिका असल्यामुळे महेश कोठारे या नाटकाची रंगीततालिम पाहण्यासाठी गेले होते. त्यावेळी लक्ष्मिकांत बेर्डेंचा अभिनय पाहून महेश कोठारे खूपच प्रभावित झाले.
कारणही तसच होतं, लक्ष्याने बबन प्रभुंची भुमिका तंतोतंत साकारली होती. त्याचवेळी त्यांनी 1 रुपया देत लक्ष्मिकांत बेर्डेला म्हटले की जेव्हा केव्हा मी माझा चित्रपट काढेन तेव्हा मुख्यनायकाच्या भुमिकेत तू असशील अस मी तुला वचन देतो. कारण धुमधडाका चित्रपटाचा विषय त्यावेळी महेश कोठारेंच्या डोक्यात घोळत होता. लक्ष्मिकांत बेर्डेंनीही महेश कोठारेंची ही ऑफर आनंदाने स्विकारली.
लक्ष्मीकांत बेर्डेंना विनोदवीर म्हणून ओळख देणारा चित्रपट-
पुढे काही दिवसात महेश कोठारे दिल्या वचनाला जागले आणि निर्मिती झाली धुमधडाका चित्रपटाची. तुम्हा सर्वांनाच माहिती आहे की त्यावेळी गाजलेल्या या चित्रपटाने लक्ष्मीकांत बेर्डेंना चित्रपटसृष्टीत विनोदवीर अशी ओळख मिळवून दिली. त्याचबरोबर लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, महेश कोठारे यांच्या आदर्श मैत्रिचा ठेवा या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीला मिळाला.