कसा निर्माण झाला बॉलीवूडमध्ये शिवसेनेचा दरारा? बाळासाहेबांनी असे काय केले..

महाराष्ट्राच्या राजकारणात विविध क्षेत्रातील लोक सक्रीय असल्याचे पाहायला मिळते. समाजसेवक, खेळाडू, कलाकार देखील राजकीय पक्षांमध्ये प्रवेश करत आपली प्रतिष्ठा आजमावत असतात. त्यामुळे कलाक्षेत्राचे महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळे वलय आहे. मात्र, गतवर्षी अभिनेत्री कंगना राणावत प्रकरणामुळे राज्यातील संपूर्ण राजकारण ढवळून निघाले. एकेकाळी शिवसेनेची बॉलीवुडवर असलेली वचप आता संपुष्ठात आलीये का ? असा सवाल उपस्थित झाला. अभिनेता सुशांत सिंह राजपुत आत्महत्या प्रकरणानंतर अभिनेत्री कंगनाने मुंबई पोलीसांवर केलेल्या आरोपामुळे सत्तेत असलेली शिवसेना आणि कंगनामध्ये शाब्दिक युद्ध पहायला मिळाले. जाणकारांनी तर बाळासाहेब असते तर कदाचित परीस्थिती काहीशी वेगळी असती असे म्हणत शिवसेनेतील बदलावर प्रकाश टाकला, मात्र सोशल मिडीयावर राज्यसरकार सत्तेच्या बळावर कंगनाला त्रास देत आहे असेही आरोप अनेकांनी केले. तर आपण आज पाहणार आहोत नक्की काय आहे शिवसेनेचं बॉलीवुड कनेक्शन.

‘सोंगाड्या’मुळे शिवसेनेची बॉलीवुडमध्ये एन्ट्री..

तर ही गोष्ट आहे ज्येष्ठ अभिनेते दादा कोंडके यांच्या पहिल्या वहिल्या चित्रपटाची. दादा कोंडकेंचा पहिला चित्रपट सोंगाड्या प्रदर्शित झाल्यानंतर. (सोंगाड्या हा १९७०मध्ये प्रदर्शत झालेला मराठी चित्रपट आहे. यात दादा कोंडके आणि उषा चव्हाण यांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या.) दादांना या चित्रपटासाठी पुण्यात थिअटर मिळाले होते. मात्र, मुंबईत या चित्रपटासाठी त्यांना मराठी वस्ती प्रामुख्याने असलेल्या दादर सारख्या परिसरात थिअटर हवे होते. त्यासाठी दादानी दादरच्या रानडे रोडवर असलेल्या कोहीनूर थिअटरची निवड केली. त्यांना या थिअटरमध्ये आपला चित्रपट रिलीज करायचा होता. त्याकरता थिअटर मालकाशी (पंजाबी गृहस्थ होते कपूर आडनाव असलेले) बोलून चार आठवड्यांचे काँट्रॅक्ट त्यांनी केले. पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांनी सोंगाड्या चित्रपटाला भरभरुन प्रतिसाद दिल्यामुळे चित्रपट हाऊफुल चालला. परंतु, दुसऱ्या आठवड्यात थिअटर मालकाने चित्रपट स्क्रिनिंग थांबवल. याच कारण होतं देवानंद यांचा चित्रपट ‘तेरे मेरे सपने’. त्यावेळी देवानंद हे खूप मोठे प्रसिद्ध अभिनेते होते. अर्थात त्याकाळीही नवख्या कलाकाराऐवजी प्रेक्षक देवानंद यांना पसंदी देतील आणि चित्रपट हिंदी असल्यामुळे थिअटर मालकाने सोगांड्या चित्रपटाचे स्क्रिनिंग थांबवले.

चार आठवड्यांचे काँट्रॅक्ट असूनही चित्रपट उतरविल्यामुळे अस्वस्थ झालेले दादा वेगवेगळ्या मंत्र्यांना भेटू लागले. त्यावेळी तात्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचीही त्यांनी भेट घेतली. मुख्यमंत्र्यांची भेट घेवूनही दादांच्या पदरी निराशा आली. दादांच्या एका मित्राने त्यांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंकडे जाण्याचा सल्ला दिला. शिवसेनेची नुकतीच स्थापना झाली होती (शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 रोजी केली) नवीन पक्ष असून देखील आपल्या कामामुळे या पक्षाने राजकाराणात उत्तम ठसा उमटवला होता.

सदर प्रकरण घेऊन दादा बाळासाहेबांकडे गेले. आताच्या अभिनेत्यासारखे सोशल मिडीयावर व्हायरल न झाल्यामुळे दादांचा बाळासाहेबांशी तितका परिचय नव्हता. मात्र, बाळासाहेबांना दादांचे ‘विच्छा माझी पुरी करा’ हे नाटक माहीत होते. दादांनी भेट होताच बाळासाहेबांना सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर बाळासाहेबांनी थिअटर मालकाला फोन केला आणि घडलेल्या प्रकरणावर संवाद साधला. मात्र, थिअटर मालकाने आरेराविची भाषा करत बाळासाहेबांना दाद दिली नाही. या प्रकरणामुळे बाळासाहेबही संतापले आणि दादाही संतापले. बाळासाहेबांनी शिवसैनिकांना घेऊन थिअटरकडे धाव घेतली. त्यानंतर शिवसैनिकांनी थिअटर मालकाला बाहेर बोलावल आणि बाळासाहेबांनी थिअटर मालकाला आपल्या भाषेत सज्जड दम भरला की, जोपर्यंत हा चित्रपट सुरु आहे तोपर्यंत तुम्ही तिथे यायचं नाही. बाळासाहेंबांची ही मागणी कपूर यांनी मान्य केली संपूर्ण 4 आठवडे चित्रपट कोहीनूर थिअटरला हाऊसफुल चालला. या चित्रपटाने सिल्व्हर जुबली केली. यानंतर दादांनी सलग 9 सिल्व्हर जुबली चित्रपट केले. सोंगाड्या चित्रपट त्यावेळी प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे सुपरडुपर हिट ठरलेला चित्रपट आहे. या प्रकरणाच्या निमित्ताने शिवसेनेची एक दमदार एन्ट्री चित्रपट क्षेत्रात झाली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

मराठी चित्रपटांसाठी अनेकदा शिवसेना झाली आक्रमक..

केवळ सोंगाड्या चित्रपटासाठीच नव्हे तर नंतरही अनेकदा शिवसेना मराठी चित्रपटांना थिअटर मिळवून देण्यासाठी आक्रमक झालेली दिसून आले. त्यामुळे मुंबईत चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी बॉलिवूडमधील ही अनेक निर्माते, अभिनेते, दिग्दर्शक बाळासाहेंबाच्या भेटीला येत असतं. अगदी संजय दत्त, सलमान खान, अमिर खान यांसारखे अनेक अभिनेते या ना त्या कारणाने बाळासाहेब ठाकरेंना भेटायला आल्याचे किस्से आहेत. अभिनेता संजय दत्तलाही बाळासाहेबांनी मोठ्या प्रमाणात मदत केली. कोणत्याही सिनेमाला विरोध होत असेल तर बाळासाहेब ठाकरेंच्या भुमिकेकडे गांभिर्याने पाहीले जात असे, असा हा सोंगाड्या चित्रपटापासून सुरु झालेला सिलसिला पुढे अनेक वर्ष सुरु राहिला. आज कुठेतरी कंगना प्रकरणानंतर शिवसेनेचा तो दरारा बॉलीवुडमध्ये राहीला आहे का ? असा सवाल उपस्थित होतोय.

बाळासाहेबांनंतर पुतण्या राज यांनी निर्माण केला दरारा-

बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर शिवसेना आणि बॉलीवुड हे कनेक्शन आता आदित्य ठाकरेंमुळे काही प्रमाणात दिसून येते. मात्र, दबदबा आजही मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा पाहायला मिळतो. मधल्या काळात मराठी चित्रपटांना स्क्रिनिंग मिळवून देण्यासाठी राज यांच्या चित्रपट सेनेने आक्रमक पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळाले होते. अनेकदा मनसेने विरोध केल्यानंतर चित्रपट निर्माते कृष्णकुंजच्या पायऱ्या झिजवताना दिसून आले आहेत. आजही मराठीचा मुद्दा उपस्थित होतो तेव्हा राज ठाकरे हे नाव सर्वांसमोर पर्याय म्हणून दिसून येते. अनेकदा सलमान, अमिर, शहारुख सारखे अभिनेते राज यांच्या भेटीला येतात. तर हा किस्सा होता दादांचा सोंगाड्या चित्रपट आणि ठाकरेंच्या बॉलीवुड कनेक्शनचा. खऱ्या अर्थाने आज शिवसेना तो दबदबा बॉलीवुडवरमध्ये टिकवून आहे का?  हा सवाल सध्या उपस्थित होतोय…