ऑपरेशन ब्लू स्टारच्या यशामागे होता एका मराठी माणसाचा हात..

अलीकडेच सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामध्ये खलिस्तानवादी तत्वे घुसलेली आहेत असे म्हटले गेले.  या अनुषंगाने आज आम्ही तुम्हाला ऑपरेशन ब्लू स्टार ची आठवण करून देत आहोत. भारतातून खलिस्तानवादी दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी ज्यांनी योगदान दिले त्या विशेष व्यक्तीविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात कोरले गेलेले नाव म्हणजे जनरल अरुण कुमार वैद्य.

गेल्या काही दिवसात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामध्ये खलिस्तानवादी दहशतवादाचा पुरस्कार करणारी तत्त्वे घुसली असल्याचा आरोप करण्यात आला. खलिस्तानी दहशतवाद म्हणजे नक्की काय? 70-80 च्या दशकामध्ये पंजाब हा अत्यंत अशांतीचा प्रदेश झाला होता.

खलिस्तानवाद्यांची संख्या त्यावेळी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढली होती. खलिस्तानी दहशतवाद त्यावेळी देशासाठी मोठी डोकेदुखी ठरला होता. वेगळ्या खलिस्तानची मागणी करणाऱ्या संघटना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तयार झाल्या होत्या. बब्बर खालसा किंवा यांसारख्या अनेक संघटनांचा उदय त्या ठिकाणी झाला होता. यांच्यापैकी सर्वात मोठे नाव होते जनरल सिंह  भिंद्रनवाले यांचे. देशाला चिंता वाटेल अशी लोकप्रियता त्यांनी शीख तरुणांमध्ये निर्माण केली होती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या ठिकाणी दहशतवादी कारवायांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती.

याप्रकरणी गांभीर्याने कारवाई करावी असा विचार तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केला होता. परंतु, कारवाई कशी करावी हा त्यांच्यापुढे खूप मोठा प्रश्न होता. कारण, भिंद्रनवाले यांनी 1980च्या दरम्यान शीख समुदायासाठी अतिशय पवित्र असलेल्या सुवर्ण मंदिर परिसरात आपला डेरा जमवला होता. असेही म्हटले जाते की त्यावेळी अनेक सशस्त्र सैन्य म्हणून समुदायातील तरुण त्यांच्यासबत होते.

त्याचबरोबर त्यांच्याजवळ मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा देखील होता. त्यामुळे या ठिकाणी कारवाई कशी केली जाईल, हा प्रश्न तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना पडला होता. तसेच पंजाब शांत करण्यासाठी पंतप्रधानांकडे जनता मागणी करत होती. दहशतवादाचा बिमोड ही सर्वात मोठी समस्या झाली होती. देशातच नव्हे तर जगात या खलिस्तान वादाची चर्चा होऊ लागली. त्यामुळे इंदिरा गांधींनी याठिकाणी कारवाई करण्याचा निर्णय घेतला.

इंदिरा गांधीनी त्यावेळचे सैन्याचे लेफ्टनंट जनरल एस के सिन्हा यांच्याशी सुवर्ण मंदिर रिकामे करण्यासंदर्भात चर्चा केली. परंतु, सिन्हा म्हणाले अशा प्रकारची कारवाई केल्यास याचे पडसाद चुकीच्या पद्धतीने उमटतील. तसेच शीख समुदायामध्ये यामुळे चुकीचा संदेश  पसरेल. त्यामुळे आपण अशी कारवाई करू नये असा सल्ला त्यांनी इंदिरा गांधी यांना दिला. परंतु, वाढता दहशतवाद लक्षात घेता इंदिरा गांधींनी  कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला.  मात्र ही जबाबदारी कोणावर सोपवायची हा विचार सुरू होता. तेव्हा इंदिरा गांधींनी ही जबाबदारी मराठमोळे जनरल अरुण कुमार वैद्य यांच्यावर सोपवायची ठरवले. त्यावेळी ते लष्कर प्रमुख होते. अत्यंत अभ्यासू आणि भारदस्त व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख होती.

सुरुवातीला या कारवाईमध्ये भिंद्रनवाले यांना पकडायचे असे ठरले होते. त्या ठिकाणाहून दहशतवादी लोकांना बाहेर काढताना कोणत्याही नागरिकांना त्रास होऊ नये असे नियोजन करण्यात आले होते. जनरल अरुणकुमार वैद्य यांनी याचा संपूर्ण आराखडा तयार केला.  कशाप्रकारे घेराव घालायचा कशाप्रकारे दहशतवाद्यांना पकडायचे आणि नागरिकांना सुरक्षित बाहेर कसे काढायचे हे ठरवलेल्या प्लॅनला ऑपरेशन ब्लू स्टार असे नाव देण्यात आले. या संपूर्ण कारवाईचे नियोजन आखणी जनरल अरुणकुमार वैद्य यांनी केली होती.

कारवाई सुरू झाल्यानंतर लष्करी जवान मंदिरामध्ये घुसले यावेळी भिंद्रनवाले यांचे अनेक अनुयायी मारले गेले. मंदिरात असलेल्या लायब्ररी ला आग लागली. त्यामध्ये अनेक दस्तावेज, ग्रंथ जळून खाक झाले. त्यामुळे शीख समुदायामध्ये या कारवाई विरोधात नाराजीचा सूर उमटला .परंतु, या वेळी भिंद्रनवाले मारले गेल्यामुळे या संपूर्ण दहशतवादी कारवायांचा कणा मोडला. खलिस्तान वाद्यांचा देशभरातून बिमोड झाला. या दहशतवादाविरोधातील कारवाईचे श्रेय दिले गेले मराठमोळ्या अरुणकुमार वैद्य यांना. त्यानंतर ऑपरेशन ब्लू स्टारचे दूरगामी परिणाम पाहायला मिळाले.

अरुण कुमार वैद्य आणि इंदिरा गांधींची हत्या

खलिस्तानवाद्यांनी इंदिरा गांधींची हत्या केली. हे प्रकरण इतक्यावर थांबले नाही. तर अरुण कुमार वैद्य 1986 साली सेवानिवृत्त झाले आणि ते पुण्यामध्ये स्थायिक झाले. निवृत्तीनंतर अवघ्या सहा महिन्यात त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. खलिस्तानवादी दोन अतिरेकी जिंदा आणि सुका यांनी पुण्यात त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. दरम्यान त्यांच्या कुटुंबालाही यावेळी दुखापत झाली त्यांच्या पत्नीलाही गोळ्या लागल्या. त्यानंतर 1992 साली जिंदा आणि सुका यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. परंतु,  आजही देशातून खलिस्तानवादी चळवळीचा बिमोड करण्याचे श्रेय इंदिरा गांधी यांना जाते तसेच ते जनरल अरुणकुमार वैद्य यांनाही जाते.

लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या एका धार्मिक स्थळातून दहशतवाद्यांना बाहेर काढणे तसेच देशातील दहशतवाद समूळ नष्ट करणे ही खूप मोठी कामगिरी होती आणि ही कामगिरी करण्यामागे एक मराठी माणूस होता.  पंजाबला शांत करण्यामागे जनरल अरुण कुमार वैद्य यांचा मोठा वाटा आहे. यासाठी त्यांना प्राण गमवावे लागले. तर गेल्या काही दिवसात शेतकरी आंदोलनामध्ये खलिस्तानवादी विचार घुसल्याचे आरोप केले जात आहेत. अर्थात हे  आरोप शेतकऱ्यांनी खोडून काढले आहेत. खलिस्तान वादाची आठवण निघाली तर जनरल अरुणकुमार वैद्य यांची आठवण आजही आल्याशिवाय राहत नाही.