सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते दादा कोंडके आणि उषा चव्हाण ही जोडी संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. परंतु, या जोडीचा रुपेरी पडद्यावरचा प्रवास नक्की कसा सुरू झाला याविषयी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्याचबरोबर आशा पारेख यांनी दादा कोंडकेंनी चित्रपटात काम करण्यासाठी दिलेली ऑफर का नाकारली हे ही आज आपण जाणून घेऊया.
तर ही गोष्ट आहे सोंगाड्या चित्रपटातील चित्रीकरणाच्या वेळची. सोंगाड्या मराठी चित्रपट विश्वातला एक अजरामर चित्रपट. या चित्रपटातून दादा कोंडके यांनी आपल्या रुपेरी कारकिर्दीला सुरुवात केली. सोंगाड्याच्या माध्यमातून अभिनेत्री उषा चव्हाण आणि दादा कोंडके ही जोडी सर्वांच्या समोर आली. नंतर बराच काळ या जोडीनं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. परंतु, मंडळी सोंगाड्या चित्रपटासाठी नायिका म्हणून उषा चव्हाण हे नाव दादा कोंडके यांच्या मनात कधीही नव्हतं. त्यावेळी अभिनेत्री जयश्री गडकर या सर्वात लोकप्रिय अभिनेत्री होत्या. त्यामुळे बॉक्स ऑफिसची पार्श्वभूमी लक्षात घेता दादांच्या समोर जयश्री बाईंचा चेहरा होता. त्यावेळी जयश्री गडकर या सूर्यकांत आणि अरुण सरनाईक यांच्यासारख्या देखण्या नटांसोबत काम करणाऱ्या अभिनेत्री असल्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व दादांसोबत कुठेही बसत नव्हते. त्यामुळे जेव्हा दादांकडून त्यांना विचारणा झाली तेव्हा त्यांनी या चित्रपटासाठी स्पष्ट नकार दिला. त्यामुळे दादांना ‘केला इशारा जाता जाता’ फेम उषा चव्हाण यांच्या नावाला नावाचा विचार करावा लागला.
आशा पारेख यांनी दादांची ऑफर धुडकावली
उषा चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यापूर्वी दादांनी आणखी एका अभिनेत्रीकडे विचारणा केली होती. ती व्यक्ती होती हिंदी चित्रपट सृष्टीतल्या दिग्गज अभिनेत्री आशा पारेख. त्यावेळी चेंज म्हणून अभिनेत्री आशा पारेख यांना मराठी चित्रपटांमध्ये काम करायची इच्छा होती आणि ही गोष्ट दादांच्या कानावर आली होती. त्यामुळे ते आशा पारेख यांना भेटायला गेले. तेव्हा त्यांनी आशा पारेख यांना सोंगाड्या चित्रपटाची कथा ऐकवली. ती त्यांना प्रचंड आवडली होती. त्यावेळी त्यांनी दादांना मोठ्या उत्सुकतेने विचारले होते की आपल्या चित्रपटामध्ये मुख्य नायक कोण आहे? दादांनी उत्तर दिले की मी स्वतः या चित्रपटामध्ये मुख्य नायक म्हणून काम करत आहे. दादांचे उत्तर ऐकून आशा पारेख यांच्या कपाळावर एकदम आठ्या पडल्या. ज्या पाहून दादांनी पुन्हा सिनेमाच्या मुख्य नायिकेच्या रूपात आशा पारेख यांना विचारायची हिंम्मत केली नाही. त्यानंतर मुख्य नायिका म्हणून कोणत्याही अभिनेत्रीला विचारले नाही. अगदी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये देखील.
उषा चव्हाणांची निवड
शेवटी त्याकाळी प्रसिद्ध असलेल्या उषा चव्हाण यांच्या नावाचा विचार करणे दादांना क्रमप्राप्त होते. त्यानंतर सोंगाड्या चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या माध्यमातून त्या दोघांची जोडी सर्वांना रुपेरी पडद्यावर पाहायला मिळाली. त्यानंतर ‘एकटा जीव सदाशिव’,’पांडू हवलदार’,’ राम राम गंगाराम’, ‘बोट लावीन तिथे गुदगुल्या’, ‘आली अंगावर’,’मुका घ्या मुका’,’पळवा पळवी’, ‘गनिमीकावा’ यासोबतच ‘तेरे मेरे बीचमे’, ‘अंधेरी रात मे दिया तेरे हाथ में’ अशा हिंदी सिनेमांमध्ये देखील दोघांनी एकत्र काम केले. काही दिवसातच ही जोडी प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत झाली. त्यामुळे सोंगाड्या हा चित्रपट दादा कोंडके यांच्या कारकिर्दीतला पहिला चित्रपट म्हणून जितका महत्त्वाचा होता. तितकाच अभिनेत्री उषा चव्हाण यांच्यासाठी ही महत्त्वपूर्ण आणि यश मिळवून देणारा ठरला.