एखादा कलाकार जेव्हा एखादी भूमिका करतो तेव्हा तो त्या भूमिकेमुळे प्रसिद्ध होतो. पुढे लोक त्याला त्याच नावाने ओळखायला लागतात. असेच काहीसे बॉलिवूडचे ज्येष्ठ कलाकार मनोज कुमार यांच्या बाबतीत झाले आहे. मनोज कुमार यांनी देशभक्तीपर चित्रपट केल्यामुळे पुढे लोक त्यांना भारत कुमार या नावाने ओळखू लागले. मनोज कुमार यांनी अवघ्या 20 वर्षाच्या वयात सन 1957 मध्ये चित्रपट फॅशन मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. यानंतर त्यांनी ‘काच कि गुडिया’ (1960), ‘हरियाली और रास्ता,-(1962), ‘वो कौन थी’ (1964) यांसारखे चित्रपट देखील केले. परंतु,त्यांना 1965 च्या ‘शहीद’या चित्रपटामुळे लोकप्रियता मिळाली. आज आपण शहिद चित्रपटाविषयी बोलणार आहोत. हा एक असा चित्रपट होता त्याने प्रत्येक भारतीयाच्या मनात देशभक्ती जागी केली .
तर ही गोष्ट आहे 1966 सालची. बॉलिवूड दिग्दर्शक एस. राम. शर्मा यांनी ‘शहीद’ चित्रपट प्रदर्शित केला होता. मनोज कुमार यांनी या चित्रपटात शहीद भगतसिंग यांची भूमिका साकारली होती. दरम्यान त्यांनी क्रांतीकारी शहीद भगतसिंग यांच्या आईची भेट घेतली होती. त्यावेळी त्या चंदिगड मधील एका रुग्णालयात उपचार घेत होत्या.
मनोज कुमार यांनी एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता. ते म्हणाले, शहीद भगतसिंग यांची आई विद्यावती आजारी आहेत आणि त्या चंदिगड मधील एका रुग्णालयात उपचार घेत असल्याचे कळताच मी केवल कश्यप यांच्यासोबत त्यांना भेटायला गेलो. त्यावेळी भगतसिंग यांचे बंधू कुलतारसिंग हे त्याठिकाणी उपस्थित होते. त्यांनी त्यांच्या आईला सांगितले की ‘शहिद’ चित्रपटांमध्ये यांनी भगत सिंगची भूमिका साकारली होती. त्यानंतर त्या मला अशा प्रकारे न्याहाळू लागल्या की मी त्यांच्या मुलाच्या भूमिकेसाठी योग्य आहे की नाही. बराच वेळ न्याहळल्यानंतर त्या हळू आवाजात म्हणाल्या की, “तू हुबेहूब भगतसिंग सारखाच दिसतोस” आणि त्यांचे हे शब्द ऐकून मला प्रचंड आनंद झाला.
मनोज कुमारची विनंती केली मान्य
मनोज कुमार म्हणाले, भगतसिंग यांच्या आईला भेटल्यानंतर हे लक्षात आले की त्या डॉक्टरांनी सांगितल्यानंतर सुद्धा औषध घेत नाहीत. परंतु, जेव्हा मी त्यांना औषध घेण्यासाठी विनंती केली तेव्हा त्या म्हणाल्या तू म्हणत आहेस तर मग मी औषधे घेते. माझ्या विनंतीचा मान ठेऊन त्यांनी औषधे घेतली.
शहीद चित्रपटातील इतर कलाकार
शहीद चित्रपटामध्ये मनोज कुमार यांनी भगतसिंग, प्रेम चोपडा यांनी सुखदेव, अनंत पुरुषोत्तम मराठे यांनी राजगुरू यांची भूमिका केली होती. त्याचबरोबर अभिनेत्री कामिनी कौशल यांनी भगतसिंग यांची आई विद्यावती यांची भूमिका केली होती. तर मनमोहन यांनी चंद्रशेखर आझाद यांची भूमिका साकारली होती.
तीन राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट
भारतीय चित्रपटांमध्ये शहीद हा पहिला भारतीय चित्रपट आहे ज्याला तीन राष्ट्रीय पुरस्कार आहेत. मनोज कुमार यांनी आत्तापर्यंत जास्तीत जास्त देशभक्तीपर चित्रपटांमध्ये काम केले आहे. केवळ अभिनयच नाही तर काही देशभक्तीपर चित्रपटांची निर्मिती-दिग्दर्शन देखील त्यांनी केले. त्यांनी माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या सांगण्यावरून ‘उपकार’ चित्रपट बनवला होता जो शास्त्री यांच्या ‘जय जवान,जय किसान’ या घोषणेने वर आधारित होता.
याशिवाय मनोज कुमार यांनी ‘गुमनाम’, ‘पत्थर के सनम’, ‘उपकार’, ‘पूरब और पश्चिम’, ‘रोटी कपडा और मकान क्रांती’, ‘नीलकमल’, ‘हिमालय की गोद मे’, ‘दो बदन’, ‘दस नंबरी’ आणि ‘संन्यासी’ यांसारखे अनेक चित्रपट केले. मनोज कुमार यांना ‘उपकार’ चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.