TVF Aspirants Series मधीली ५ पात्र आणि त्यांच वेगळेपण..

सध्या Tvf ची वेब सिरीज aspirants सर्वत्र बरीच चर्चेत आहे. सोशल मिडीयावर या मालिकेचे फॅन क्लब सुरु होत आहेत. मिम्स पेज तयार करण्यात आले आहेत. चाहत्यांमध्ये शाब्दिक युद्ध पहायला मिळत आहे. कारण यातल्या प्रत्येक पात्राशी लोक तुलना करत आपल्याला जोडून पाहत आहेत. ही सिरीज घरातल्यांपासून दूर राहून यूपीएससीचा अभ्यास करत असलेल्या तीन विद्यार्थ्यांवर आणि त्यांच्या मैत्रिणीवर आधारीत आहे.  ही मालिका दिल्लीच्या युपीएससी हब मानल्या जाणार्‍या राजेंद्र नगर भागात घडते. तसे, या कथेचा संपूर्ण आशय हा भारतात सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या युपीएससी स्पर्धा परीक्षेशी निगडीत आहे. परंतु ते पहात असताना, आपल्याला जीवनाबद्दल बरेच काही शिकायला आणि जाणून घ्यायला मिळते.

आज आपण या मालिकेतल्या पाच मुख्य पात्रांविषयी जाणून घेणार आहोत. ज्यांचे आयुष्य कोणत्या ना कोणत्या प्रकारे एकमेकांशी जोडलेले आहे.  ही पात्रं इतकी खरी आहेत की जणू काही आपल्या शेजारच्याच घरात राहतात. हेच कारण आहे की लोकांचे या पात्रांनी लक्ष वेधून घेण्याचे. चला तर मग आपण टीव्हीएफ च्या या मालिकेतील पाच पात्रांची कथा जाणून घेऊया.

श्वेतकेतु झा उर्फ ​​एसके

SK Sir

मालिका सुरू होताच सर्वात पहिल्यांदा आपल्याला भेटणारे पात्र म्हणजे एसके. त्याचे पूर्ण नाव आहे श्वेतकेतु झा. परंतु विद्यार्थी त्याला एसके सर म्हणून ओळखतात. तीन मित्रांमधील एसके हा सर्वात समजदार माणूस आहे. यूपीएससीची तयारी करत होता पण तो कधीच ती परीक्षा क्रॅक करु शकला नाही. ज्या परीस्थितीत लोक खचून जातात त्याऐवजी हा जोमाने उभा राहिला. त्याच्या निराशेने त्याच्या आयुष्यात स्पष्टता आणली आहे.  यूपीएससीची तयारी करण्यासाठी त्यांच्या काकांनी वंचित मुलांसाठी एक संस्था उघडली. एसके सर देखील तिथे तीन तासांचा विनामूल्य वर्ग घेतो. एकीकडे मुले त्याचे विचार ऐकून प्रेरित होतात आणि दुसरीकडे ते त्याच्या बाईकवर लावलेला निळा दिवा पाहून त्याची खिल्ली उडवतात. मालिकेत एसके आपल्या दोन महाविद्यालयीन मित्रांशी समेट करण्यासाठी आपला बराच वेळ खर्च करताना दिसतो. या मालिकेत विनोदी अभिनेता अभिलाष थापलियालने एसकेची भूमिका साकारली आहे.

अभिलाष शर्मा

Abhilash Sharma

जेव्हा आपण ही मालिका पाहण्यास सुरुवात कराल, तेव्हा अभिलाषचे पात्र त्याच्या ध्येयाबद्दल सर्वात गंभीर दिसेल.  अभिलाष पूर्वी खाजगी नोकरी करायचा. नोकरीबरोबरच तो यूपीएससीचीही तयारी करत होता. पण काहीही झाले नाही.  शेवटचा प्रयत्न करण्यासाठी तो तयारी करायला राजेंद्र नगरला आला. पण अभिलाषची समस्या अशी आहे की त्याला प्रत्येक गोष्टीत समस्या दिसते. परंतु त्या समस्येचा सामना कसा करावा हे त्याला माहित नाही. आता आजूबाजूच्या वातावरणातून शिकून त्याने या गोष्टींवर मात केलीये.मात्र, तो धैर्य नावाच्या एका यूपीएससीची तयारी करत असलेल्या मुलीच्या प्रेमात पडतो आणि स्वतःच दूर होण्याचा निर्णय घेतो. या सर्वांमध्ये यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊन आयएएस झालेला तो एकमेव आहे. परंतु कित्येक वर्षांचे ‘प्रेम’ ही त्याच्या आयुष्यातील शेवटची गोष्ट आहे, ज्यामध्ये तो अजूनही अडकलेला आहे. लोकप्रिय वेब अभिनेता नवीन कस्तुरिया यांनी या मालिकेत अभिलाष शर्माची भूमिका साकारली आहे.

गुरी उर्फ ​​गुरप्रीत सिंग

टीव्हीएफच्या या मालिकेतले मजेदार परंतु सर्वात अधोरेखित पात्र म्हणजे गुरी.  एसके, अभिलाष आणि गुरी हे कॉलेजच्या काळापासूनचे चांगले मित्र आहेत. एकत्रितपणे यूपीएससीचीही तयारी करत आहेत. पण गुरी यामध्ये अजिबात गंभीर नाही.  कारण त्याच्या वडिलांचा हरियाणामध्ये कारखाना आहे.  तेथे 20 एकर जमीन आहे.  त्यामुळे तो थोडा आपल्याच धुंदीत मग्न माणूस आहे. पण गुरी आणि अभिलाष अजूनही भूतकाळात अडकलेले आहेत. या दोघांमध्ये काहीतरी वाद आहे. दोघांमध्ये समेट घडवून आणण्यासाठी एसके मेहनत घेत असल्याचे दिसते. गुरीला आयुष्यात यूपीएससी पास होता आले नाही.  सिरीज प्लॅनिंगनुसार पुढे तो व्यावसायिक बनतो. स्थानिक कंपनीचे शूज बनवत असतो. आता त्याचे लग्न होणार आहे. गुरीने अभिलाषलाही लग्नासाठी आमंत्रण द्यावे अशी एसकेची इच्छा आहे. पण गुरीला ते नको आहे. त्याला हे का नको आहे याबद्दल सिरीजमध्ये एक भाग आहे.  The Screen Patti चा हिट शो ‘रबिश की रिपोर्ट’ मध्ये पत्रकार राजा रवीश कुमार बनलेल्या शिवंकीत परिहार ने TVF Aspirants मध्ये गुरीची भुमिका साकारली आहे.

संदीप भैय्या-

Sandeep Bhaiya

संदीप ओहलान उर्फ ​​संदीप भैय्या. तो या मालिकेतले सर्वात वेगळे पात्र आहे. शांत अनेक वर्ष यूपीएससी परीक्षा द्यायला इच्छुक असलेला एक विद्यार्थी. ज्याच्याकडून तयारी कशी करावी हा सल्ला घेण्यासाठी मुले येतात. सर्व मुले संदीप भैय्याचा खूप आदर करतात.  त्याचा देखील हा शेवटचा प्रयत्न आहे. कसं तरी अभिलाषशी त्याची मैत्री होते. संदीप हा गरीब कुटुंबातला मुलगा आहे, ज्याला कोचिंग परवडत नाही. पूर्वी घरातील लोक विचारत असत की यूपीएससी पास झाल्यास तू काय करशील, आता त्याने हा प्रश्न स्वतःला विचारण्यास सुरूवात केली आहे. पण इतकी वर्षे घालवल्यानंतर त्याच्याकडे यूपीएससी न पास होण्याचा पर्यायच उरलेला नाही. या पात्राशी युपीएससी सारख्या स्पर्धा परिक्षा देणारे अनेक विद्यार्थी स्वतःला जोडून पाहतील तर त्यांना हे पात्र जवळचे वाटेल.  संदीप ओहलानची व्यक्तिरेखा ‘द फॅमिली मॅन’ फेम अभिनेता सनी हिंदुजाने साकारली आहे.

धैर्या–

Dhairyaa

TVF Aspirants मध्ये एक महिला पात्र देखील आहे. जी यूपीएससी पास होण्याचे स्वप्न पाहते. तीचे नाव धैर्य आहे. यूपीएससी पास होईल की नाही हे माहिती नाही पण मुलांमधील नशा दूर करणे  हे तिचे ध्येय आहे. मात्र, त्यामागील कोणतीही बॅकस्टोरी सांगितली गेलेली नाही. धैर्य आणि अभिलाष एकत्र तयारी करताना प्रेमात पडतात. परंतु त्यांना असे वाटते की या नात्याचे काहीच भविष्य नाही. म्हणून ते वेगळे होतात. आपल्याला धैर्याबद्दल बरेच काही माहित नाही. पण हे पात्र मालिकेत पुनरागमन करते. यावेळी ती एका मोठ्या बदलांमध्ये कॅटलिस्टची भूमिका निभावते. अभिनेत्री नमिता दुबेने या मालिकेतील धैर्यची भूमिका केली आहे.

TVF Aspirants ही मालिका दीपेश सुमित्रा जगदीश यांनी लिहिली आहे. त्यांना तुम्ही TVF Flames कौशल सर म्हणून ओळखत असाल. अपूर्व सिंह करकी यांनी या मालिकेचे दिग्दर्शन केले आहे. TVF Aspirants ला टीव्हीएफच्या यूट्यूब चॅनेलवर विनामूल्य पाहता येईल.