रोज सकाळी शाळा भरल्यानंतर प्रार्थनेची सुरुवात राष्ट्रगीताने केली जाते. शालेय जीवनापासूनच आपल्याला या राष्ट्रगीताची ओळख शिक्षक करुन देत असतात. आता शहरी काय आणि ग्रामीण काय सर्वच ठिकाणी आई वडील सुशिक्षित असल्यामुळे शालेयपूर्व जीवनातच अनेक लहानग्यांना बऱ्याच गोष्टींचे ज्ञान घरातच दिले जाते. तर आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या लहानपणी प्रार्थनेच्या सुरुवातीला म्हटल्या जाणाऱ्या राष्ट्रगीता बद्दल….
सुप्रसिद्ध कवी, लेखक, नोबेल पारितोषिक विजेते रविंद्रनाथ टागोर यांनी ‘जन गण मन’ या राष्ट्रगीताची मूळ रचना बंगाली भाषेत केली. 24 जानेवारी 1950 रोजी या गीताला संविधान सभेने मान्यता दिली आणि ‘जन गण मन’च्या हिंदी भाषांतराला राष्ट्रगीत म्हणून मान्यता प्राप्त झाली. राष्ट्रगीत हे असे गाणे असते ज्यामध्ये आपल्या देशातील परंपरेमध्ये असलेले विविधता दर्शविली जाते. हे गीत इतिहास आणि परंपरेचे पैलू स्पष्ट करते, असे महत्वपूर्ण गीत भारताला 24 जानेवारी 1950 रोजी पहिल्यांदा ‘जन गण मन’च्या रुपात मिळाले.
राष्ट्रगीताच्या गायनाचा कालावधी आहे 52 सेकंद –
राष्ट्रगीत गायनाचा कालावधी 52 सेकंदाचा आहे, परंतु काही महत्वाच्या प्रसंगी ते थोडक्यात गायले जाते. अनेकदा ते केवळ 20 सेकंदात संक्षिप्त स्वरुपात गायले जाते. अशा वेळी केवळ राष्ट्रगीताच्या फक्त पहिल्या आणि शेवटच्या ओळी गायल्या जातात.प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन,देशातील सर्व शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालयांमध्ये आणि अलिकडच्या काळात अगदी चित्रपटगृहांमध्ये देखील चित्रपट सुरु होण्यापूर्वी राष्ट्रगीत गायले जाते.
‘केव्हा’ लिहीले गेले राष्ट्रगीत ?
तुम्हाला माहिती आहे का? सन 1911 पर्यंत भारताची राजधानी बंगाल होती. 1905 मध्ये जेव्हा बंगालची फाळणी झाली तेव्हा सर्वसान्य नागरीक तसेच आंदोलनकर्ते बंग-भंग आंदोलनाचा विरोध करु लागले. तेव्हा ब्रिटीशांनी दिल्लीला कलकत्ताऐवजी भारताची राजधानी घोषित केले. हळूहळू भारतीयांच्या अंतःकरणात स्वातंत्र्याची भावना जागृत झाली आणि तेव्हाच कलकत्ताच्या एका कोपऱ्यात “जन गण मन अधिनायक जय हे” हे गाणे जन्मले. ते तत्कालीन कवी रवींद्रनाथ टागोर यांनी बंगाली भाषेत कवितेच्या स्वरूपात लिहिले होते.
‘का’ लिहले गेले राष्ट्रगीत?
जेव्हा 1911 मध्ये कलकत्ता येथून राजधानी दिल्लीला हलवण्यात आली तेव्हा दिल्ली दरबार आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये इंग्लंडचा राजा जॉर्ज पाचवा यांना आमंत्रित करण्यात आले होते. असे म्हणतात की रवींद्रनाथ टागोर यांना त्यांच्या स्वागतासाठी एक गाणे लिहिण्यास सांगितले गेले होते. त्यावेळी टागोर कुटुंबातील बरेच लोक ईस्ट इंडिया कंपनीत काम करायचे. म्हणूनच, जेव्हा रवींद्रनाथ टागोर यांना गाणे लिहिण्यास सांगितले गेले तेव्हा त्यांनी बंगाली भाषेतील कवितेच्या रूपात ‘जन गण मन’ची रचना केली.
पहिल्यांदा कधी गायले राष्ट्रगीत?
आपल्या देशाचे राष्ट्रगीत 27 डिसेंबर 1911 रोजी कलकत्ता येथे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या वार्षिक अधिवेशनाच्या दुसर्या दिवशी प्रथम गायले गेले. टागोरांची भाची सरला देवी चौधराणी यांच्यासह काही शालेय विद्यार्थ्यांनी या गाण्याला आवाज दिला होता. हे गीत तत्कालीन कॉंग्रेस अध्यक्ष बिशन नारायण दर, भूपेंद्र नाथ बोस, अंबिका चरण मजूमदार यांच्यासारख्या काही नेत्यांसमोर गायले होते.
आपल्या राष्ट्रगीताबद्दल काही महत्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे-
- आपले राष्ट्रगीत आंध्र प्रदेशमधील मदन पिल्लई या छोट्याश्या जिल्ह्यात लयबद्ध झाले आहे.
- प्रसिद्ध कवी जेम्स कझिन यांची पत्नी मार्गारेट, ज्या बेसेंट थियोसोफिकल कॉलेजच्या प्राचार्य होत्या त्यांनी या गीताचा इंग्रजी अनुवाद केला आहे.
- संस्कृतकृत बंगाली मधून हिंदी भाषेत राष्ट्रगीताचे भाषांतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केले.
- कॅप्टन आबिद अली यांनी हिंदीमध्ये भाषांतरीत केले आणि कॅप्टन राम सिंग यांनी संगीतबद्ध केले.
- Prevention of Insults to National Honor Act, 1971 च्या कलम 3 अन्वये राष्ट्रगीताचे नियम न पाळल्यामुळे आणि त्याचा अपमान केल्याबद्दल कठोर कारवाई केली जाते.
- बांगलादेशाचे राष्ट्रगीत असलेले ‘अमर सोनार बांगला’ रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले होते आणि दोन देशांचे राष्ट्रगीत लिहिणारे हे जगातील पहिले कवी बनले होते.
- हेट विल्हेल्मस हे जगातील सर्वात मोठे डच राष्ट्रगीत आहे, जे 1574 मध्ये लिहिले गेले.