जालियनवाला बाग प्रकरण : जनरल डायरने का दिले गोळी चालविण्याचे आदेश?

भारताच्या इतिहासात 13 एप्रिल हा दिवस काळा दिवस म्हणून नोंदवला गेला. ही गोष्ट आहे जवळपास 102 वर्षांपूर्वीची, बैसाखीच्या दिवशी, पंजाबच्या अमृतसरमधील जालियनवाला बाग येथे उपस्थित शेकडो निष्पाप आणि नि: शस्त्र नागरिकांवर जनरल डायरने गोळ्या झाडण्याचा आदेश दिला आणि क्षणार्धात शेकडो निष्पाप जीव या हत्याकांडाचे बळी ठरले. 

13 एप्रिल 1919 रोजी नक्की असे काय घडले?

वास्तविक, रोलट कायद्याचा (Anarchical and Revolutionary Crimes Act of 1919) भारतीयांकडून विरोध केला होता. महात्मा गांधींनी या कायद्याच्या विरोधात देशव्यापी संप पुकारला होता. मार्चच्या शेवटी आणि एप्रिलच्या सुरूवातीस गांधीजींच्या आवाहनानंतर देशभरात अनेक निदर्शने झाली होती. हे लक्षात घेता ब्रिटीश सरकारने कर्फ्यू लागू केला आणि नियम न पाळणाऱ्यांना शिक्षा जाहीर केली.

13 एप्रिल 1919 रोजी रोलट कायदा आणि सत्यपाल व सैफुद्दीन किचलू यांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी जालियनवाला बाग येथे एक सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत काही नेते भाषणही देणार होते. कर्फ्यू लागू करूनही हजारो लोक सभेच्या ठिकाणी पोहोचले होते. यामध्ये बैसाखीच्या निमित्ताने कुटुंबासमवेत जत्रा पाहण्यासाठी आलेल्या लोकांचाही मोठ्या प्रमाणात समावेश होता ते देखील सभेची माहिती मिळताच जालियनवाला बागेत पोहोचले होते. 

जनरल डायरने दिले गोळीबाराचे आदेश-

जेव्हा नेते लोक भाषण देत होते, तेव्हा जनरल डायर 90 ब्रिटीश सैनिकांसह जालियनवाला बाग येथे पोहोचला. या सर्व सैनिकांकडे रायफल होत्या. काही वेळातच या सैनिकांनी जालियनवाला बागेला घेरले आणि कोणतीही सुचना न देता बागेत उपस्थित शेकडो नि: शस्त्र नागरिकांवर गोळीबार सुरू केला. 10 मिनिटे ब्रिटिश सैनिक निरपराध भारतीयांवर गोळीबार करत राहिले आणि यामध्ये 1650 फैरी झडल्या.

या बागेला चारी बाजूंनी ब्रिटिश सैनिकांनी वेढले असल्याने नागरिकांना तेथून पळून जाण्याची संधी मिळाली नाही. बऱ्याच लोकांनी त्यांचा जीव वाचविण्यासाठी तेथे असलेल्या एकमेव विहिरीत उड्या मारल्या आणि काही मिनिटांतच ती विहीर देखील मृतदेहांनी भरली. शहरात असलेल्या कर्फ्यूमुळे जखमींवर उपचार होऊ शकले नाहीत आणि या नागरिकांचा जागेवर तडफडून जीव गेला. 

जनरल डायरने त्याची बाजू मांडताना नक्की काय म्हटले?

हे हत्याकांड झाल्यानंतर जनरल डायरने आपल्या वरिष्ठांना टेलीग्रामद्वारे सांगितले की त्याच्यावर भारतीय सैन्याच्या एका तुकडीने हल्ला केला होता. आपला जीव वाचवण्यासाठी त्याला गोळ्या चालवाव्या लागल्या. या टेलीग्रामला उत्तर देताना ब्रिटीश उपराज्यपाल मायकेल ओ डायर यांनी जनरल डायरने केलेल्या कारवाईला योग्य असल्याचे म्हटले. यानंतर ब्रिटीश उपराज्यपाल मायकेल ओ डायर यांनी अमृतसर आणि इतर भागात मार्शल लॉ लागू करण्याची मागणी केली, याला व्हाईसरॉय लॉर्ड चेम्सफोर्ड मान्यता दिली.

मायकल यांना या प्रकरणाची माहिती देताना डायर म्हणाला, “अमृतसरची परिस्थिती माहित असलेल्या अनेकांनी म्हटले आहे की मी केलेले कृत्य बरोबर आहे … परंतु काहींच्या मते मी चूक केली आहे. मी फक्त आपल्याकडून जाणून घेऊ इच्छित आहे की मी चूक केली आहे की मी योग्य आहे” असे त्याने म्हटले होते.

जनरल डायरने गोळीबाराचा आदेश का दिला?

जालियनवाला बाग हत्याकांडावर आपली बाजू मांडताना जनरल डायर म्हणाला की, त्यांने आपल्या सैनिकांना मीटिंग पांगवण्यासाठी गोळीबार करण्याचे आदेश दिले होते. परंतु, त्यांनी आज्ञा न पाळल्यामुळे भारतीयांचा बळी गेला. डायरच्या या निर्णयाचे ब्रिटिश सरकारमधील अनेकांनी कौतुक केले आणि अनेकांनी त्याच्यावर टीका देखील केली.

हंटर आयोगाचा अहवाल-

सन 1919 च्या उत्तरार्धात या घटनेचा जगभरातून निषेध व्यक्त केला गेला. या हत्येच्या चौकशीसाठी हंटर कमिशनची नियुक्ती करण्यात आली. या आयोगाची नेमणूक भारतीय राज्य सचिव एडविन मॉन्टेग्यु यांनी केली होती. जनरल डायरने या आयोगासमोर कबूल केले की तो लोकांच्या हत्येच्या उद्देशाने जालियनवाला बाग येथे पोहोचला होता. हंटर कमिशनच्या अहवालानंतर जनरल डायरला पदावरुन काढून त्याला कर्नल करण्यात आले. तसेच त्याचे नाव निष्क्रिय यादीमध्ये ठेवण्यात आले. याच बरोबर त्याला परत ब्रिटनला पाठवण्यात आले. 1920 मध्ये ब्रिटीश सरकारने निषेधाचा ठराव मंजूर केला, त्यानंतर जनरल रेजिनॉल्ड डायरला राजीनामा द्यावा लागला. 23 जुलै 1927 रोजी सेरेब्रल हॅमरेजमुळे जनरल डायरचे निधन झाले. 

जालियनवाला बाग हत्याकांडात किती लोक ठार झाले? 

अमृतसर उपायुक्त कार्यालयात 484 शहीदांची यादी आहे, तर जालियांवाला बागेत 388 हुतात्म्यांची यादी आहे. या घटनेत 200 लोक जखमी झाले आणि 379 लोक शहीद झाले अशी ब्रिटिश दस्ताऐवजात  नोंद आहे.  अनधिकृत आकडेवारीनुसार, 1000 हून अधिक लोक शहीद झाले आणि 2000 हून अधिक जखमी झाले होते. 

सदर हत्याकांड हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरले. असे मानले जाते की ही घटना ब्रिटिशांच्या भारतातील अंताची सुरुवात ठरली. रवींद्रनाथ टागोर आणि महात्मा गांधी यांनीही या हल्ल्याचा निषेध करत ब्रिटीश नाईटहूड  आणि कैसर-ए-हिंद पदक ब्रिटिश सरकारला परत केले.

1997 मध्ये राणी एलिझाबेथ यांनी या स्मारकात मृतांना श्रद्धांजली वाहिली. 2013 मध्ये ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांनीही या स्मारकाला भेट दिली होती. स्मारकाच्या अभिप्राय पुस्तकात त्यांनी लिहिले होते की “ही ब्रिटिश इतिहासातील एक लाजिरवाणी घटना होती.”