रयतेचा राजा, राजर्षी, छत्रपती शाहू महाराज हे व्यक्तीमत्व महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या परिचयाचे आहे. शाहू महारांजानी केवळ दिनदुबळ्यांसाठीच नव्हे तर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले मोलाचे कार्य आज समाजातील प्रत्येक घटकासाठी प्रेरणादायी ठरले आहे. अशा छत्रपती शाहू महाराजांचा इतिहास आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. यामध्ये शाहू महाराजांनी त्यावेळी सामाजिक दृष्टीने राबविलेल्या योजना तसेच दलितांसाठी त्यांनी केलेले कार्य याच बरोबर त्यांचा जन्म आणि राजकीय इतिहास यावर आपण आज प्रकाश टाकणार आहोत…
कोल्हापूर जिल्ह्यातील कागल गावी 26 जून 1874 रोजी घाटगे घराण्यात झाला. त्यावेळी कोल्हापूर संस्थानचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर गादीला वारस नव्हता. त्यामुळे महाराजांच्या मृत्यू नंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी घाडगे घराण्यातील यशवंत जयसिंग घाटगे यांना 17 मार्च 1884 रोजी दत्तक घेतले आणि नामकरण झाले शाहू महाराज. शाहू महाराजांचा राज्याभिषेक इ.स. 1894 ला पार पडला. शाहू महाराजांचे शिक्षण राजकोट आणि धारवाड येथे झाले. उच्च शिक्षणासाठी कोल्हापूरच्या राजवाड्यात तशी व्यवस्था करण्यात आली. महाराजांच्या शिक्षणाची जबाबदारी ब्रिटीश अधिकारी स्टुअर्ड बिटफर्ड फ्रेझर यांच्याकडे. इंग्लिश शिक्षणाचा शाहू महाराजांच्या जीवनावर कायम प्रभाव होता. त्यामुळे त्यांच्या कार्यात आधुनिकतेचा आणि दूरदृष्टीचा कायम प्रभाव आढळतो. राज्याभिषेका पासून सुरु असलेल्या राज्यकारभारात सामाजिक कार्यात अनेक धाडसी निर्णय त्यांनी घेतले आणि पुढे ते आमलात देखील आणले. छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन समाजातील मुला-मुलींच्या शिक्षणाची मोफत व्यवस्था केली.त्यासाठी प्राथमिक शाळा, हायस्कूल, कॉलेज, वस्तीगृह यांची मोठ्या प्रमाणात निर्मिती करण्यात आली. मुलांना शाळेत न पाठविणाऱ्या पालकांना शाहू महाराजांनी त्याकाळी 1 रुपया दंड आकारला.
उत्तम कुस्तीपटू होते शाहू महाराज-
स्वतः उत्तम कुस्तीपट्टू असल्यामुळे कुस्ती या खेळाला राजश्रय मिळवून दिला तो शाहू महाराजांनी. त्यासाठी 1895 साली मोतीबाग तालमीची स्थापना केली. एवढेच करून शाहू महाराज थांबले नाहीत. तर खासबाग सारखे भव्य कुस्ती मैदानाची 1912 साली त्यांनी निर्मिती केली.
राधानगरी धरणाची निर्मिती-
शेतकऱ्यांचे प्रश्न शेतीचे सिंचन यांसारखे पाण्याचे प्रश्न सोडविण्यासाठी पाण्याची व्यवस्था. वीजनिर्मितीसाठी राधानगरी धरण बांधण्यासाठी निर्णय शाहू महाराजांनी घेतला. पुढे 1909 साली या धरणाच्या बांधकामाला सुरुवात झाली. 1918 पर्यंत या धरणाचे काम 40 फुटांपर्यंत पूर्ण केले गेले. 1957 साली हा प्रकल्प पूर्ण झाला अशी नोंद आजही इतिहासात आढळते.
कोल्हापूर मध्ये रेल्वे आणण्यामध्येही शाहू महाराजांचे महत्वाचे योगदान-
भविष्यातील दूरदृष्टी ठेवून कोल्हापूर मध्ये रेल्वे आणण्यातही शाहू महाराजांचे मोलाचे योगदान आहे. एका शहरातून दूर शहरात जाण्यासाठी लांब पल्याच्या प्रवासासाठी आजही कोल्हापूरकरांसाठी ही रेल्वे सेवा महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे. त्याकाळी शाहू महाराजांनी भविष्यात कोल्हापूर शहराच्या विकासासाठी रेल्वे आणि प्रवास सुलभ करण्याच्या दृष्टीने घेतलेला हा महत्वपूर्ण निर्णय मानला जातो.
शाहू महाराजांचा विवाह-
छत्रपती शाहू महाराज यांचा विवाह 1891 साली बडोद्याचे मराठा सरदार कृष्णराव खानविलकर यांची कन्या लक्ष्मीबाई यांच्याशी झाला. त्यानंतर त्यांना अपत्ये झाली.
शहराची रचना आणि बाजारपेठांची निर्मिती-
कोल्हापूर शहराचा विकास करताना भटक्या जनावरांसाठी पांजरपोळ, घोड्यांच्या देखभालीसाठी सोनथळी येथे मोठी पागा. कोल्हापूर शहराचा विकास करताना शहरात अनेक बाजारपेठा निर्माण केल्या. त्यांनी पश्चिम महाराष्ट्रात ऊसाचे विक्रमी उप्तन्न घेतले जात असल्याचे लक्षात घेऊन गुळाची मोठी बाजारपेठ निर्माण केली.
इ.स. 1917 साली विधवा पुनर्विवाह कायदा-
पतीच्या निधनानंतर समाजातील स्त्रियांना सती जावे लागत असे. अनेक वर्षे ही प्रथा अशीच सुरु होती. या सती प्रथेमुळे समाजातील अनेक मुलांना बालवयातच पोरके व्हावे लागत होते. कधी स्वेच्छेने तर कधी मनाविरुद्ध या स्त्रियांना सती जावे लागे. त्यांनतरच्या काळात सती प्रथा काही अंशी कमी झाल्या नंतर प्रामुख्याने ब्राम्हण समाजातील विधवा महिला लाल किंवा पांढऱ्या रंगाचे वस्त्र नेसत आणि मुंडण करत असत. मुंडण केल्यामुळे परपुरुष या महिलांकडे पाहणार नाहीत अशी त्यावेळीची धारणा होत होती. साथीच्या आजारात पती गेल्यामुळे अनेक बालविवाह केलेल्या मुलींना नशीबाने आणि समाजाने दिलेले हे वैधव्य पत्करावे लागले. स्त्रियांची या कर्मठ प्रथेतून सुटका व्हावी आणि त्यांना त्यांचे हक्काचे जीवन जगता यावे यासाठी 1917 साली शाहू महाराजांनी विधवा पुनर्विवाह कायदा निर्माण केला.
इ.स. 1919 मध्ये आंतरजातीय विवाह कायदा –
विधवा पुनर्विवाह कायद्यानंतर अवघ्या 2 वर्षात शाहू महाराजांनी आंतरजातीय विवाह कायद्यास मंजुरी दिली. त्यामुळे आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना याचा फायदा होऊ शकत होता. हा कायदा होऊन आज 100 वर्षे पूर्ण झाली असली तरीही या कायद्याचा तितकासा उपयोग झालेला नाही. अनेक वर्ष सोवळ्यात अडकलेल्या आपला समाज आजही आंतरजातीय विवाहाला सहज स्वीकारत नाही हे ही तितकेच मोठे सत्य आहे. आंतरजातीय विवाह केल्यामुळे हत्या झालेली अनेक उदाहरण आजकाल पाहायला मिळतात. जात, पात , उच-नीच हे बाजुला सारुन सर्वधर्म समभावाची भावना शाहू महाराजांनी 100 वर्षांपूर्वी आपल्या समाजात रुजविण्याचा पर्यंत्न केला. कानपूरमध्ये भरलेल्या 13 व्या क्षत्रिय अधिवेशनात महाराजांना राजर्षी हा बहुमान मिळाला.
केशवराव भोसले नाट्यगृहाची निर्मिती-
कलेला महत्व देऊन कलाक्षेत्राच्या उद्धारासाठी शाहू महाराजांनी केशवराव भोसले नाट्यगृहाची निर्मिती केली. गायन समाज देवल क्लब ची स्थापना केली. 27 मार्च 1895 ला फर्ग्युसन महाविद्यालयाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. 48 वर्षांच्या अल्प आयुष्यात बहुजन समाजासाठी इतके महान कार्य केल्यामुळे छत्रपती शाहू महाराज, राजर्षी, छत्रपती, रयतेचा राजा अशा अनेक उपाध्यांचे मानकरी ठरले. दिनांक 6 मे 1922 रोजी मुंबई येथे राजर्षी शाहू महाराजांचे निधन झाले.